| रामटेक| प्रतिनिधी |
शहरातील अंबाडा वळणाजवळ असलेल्या वनविभागाच्या क्वॉटरमधील निवासी तसेच मृगविहार रामटेक येथे देखरेख करणारे कर्मचारी देविदास चौधरी यांचा मुलगा रितेश देविदास चौधरी (24) याने घरी कोणीच नसल्याची संधी साधून गुरुवारी (दि.12) दुपारी दोनच्या सुमारास राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, रितेश हा रोज दुधाला येथे निर्माणकार्य सुरू असलेल्या एका कंपनीत वेल्डिंगचे काम करायला जायचा. गुरुवारी मात्र तो कामावर न जाता घरीच राहिला. दुपारी त्याचे वडील शासकीय कामात व्यस्त होते, तर आई बाजारात किराणा आणायला गेली होती. यादरम्यान घरी कोणीच नसल्याची संधी साधून रितेश याने नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आई किराणा घेऊन घरी परत येताच ही बाब तिला कळली. तिने लागलीच घटनेची माहिती पती देविदास चौधरी यांना दिली. घटनेची माहिती रामटेक पोलिसांना देण्यात आली. रामटेक पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतदेह उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे शवविच्छेदनाकरिता पाठविण्यात आला. रितेशच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. पुढील तपास रामटेक पोलिस करीत आहेत.
रामटेकमध्ये तरुणाने संपवले जीवन
