| रसायनी | वार्ताहर |
रसायनी परिसरातील रिस येथे एका भटक्या पिसाळलेल्या कुत्र्याने थैमान घातले होते. या कुत्र्याने रस्त्यावर ये-जा करणार्या नागरिक व महिला, लहान मुली अशा नऊ जणांना चावा घेतला. त्यामुळे ज्या नागरिकांना कुत्र्याने चावले आहे, त्यांनी परिसरातील निरामय हॉस्पिटल व चौक ग्रामीण रूग्णालय येथे धाव घेतली व इंजेक्शन आणि मलमपट्टी केली.
दरम्यान, भैरवनाथ टेडरसमोरच असणारे सलूनचे मालक संजू उर्फ शरीफ शेख (34) हे रस्त्यावर संध्याकाळी सहा वाजता आले असताना ह्या भटक्या कुत्र्याने त्यांना चावा घेतला. त्यामध्ये ते पूर्णतः घाबरले होते. त्यांनी तात्काळ चौक येथे जाऊन मलमपट्टी व इंजेक्शन घेतले; परंतु त्याच दिवशी रविवारी संध्याकाळी हॉस्पिटलमधून येऊन दुकानात काम करू लागले. त्यांच्या छातीमध्ये चमक आल्यामुळे त्यांनी निरामय हॉस्पिटल गाठले. डॉक्टरांनी त्यांना पनवेल येथे जाण्यास सांगितले. परंतु, पनवेलमध्ये हॉस्पिटलला जात असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली.
या कुत्र्याने दीड वर्षाची मुलगी, दहा वर्षाची मुलगी, तीन तरूण, सात ते आठ महिला यांना चावा घेतल्याची माहिती मिळाली आहे. ही घटना घडली असतानाही रसायनी परिसरात ठिकठिकाणी कुत्र्यांचा ग्रुपने वावर दिसून येत असून, महिला व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण झाले आहे. यासाठी वासांबे मोहोपाडा ग्रामंचायतीने मोहोपाडा व रिस परिसरात मोकाट फिरणार्या श्वानांची नसबंदी करण्याचा निर्णय घेतला असून, याला पशुवैद्यकीय अधिकार्यांनी दुजोरा दिला आहे.