प्रवाशांचे हाल, पायी जाण्याची वेळ; डिझेल बस देण्याची किल्ले नागरिकांची मागणी
| महाड | प्रतिनिधी |
महाड एसटी आगारामध्ये पूर्णतः सीएनजी बसेस दाखल झाल्या असून, या बसेस घाट मार्गावर सातत्याने बंद पडत असल्याची तक्रार किल्ले रायगड परिसरातील नागरिकांनी केली आहे. घाटातच बसेस बंद पडत असल्याने प्रवाशांचे आणि स्थानिक नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. याबाबत पूर्वीप्रमाणेच डिझेल बसेस देण्याची मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.
महाड एसटी आगारातील जुन्या डिझेल बसेस मोडीत काढल्या आहेत. सध्या सीएनजीवर चालणार्या बसेस दाखल झाल्या असून, सध्या महाड एसटी आगाराला सर्व सीएनजी बसेस उपलब्ध झाल्या आहेत. महाड तालुक्याचा बहुतांश भाग हा घाट मार्ग आहे. अनेक गावे दरी-डोंगरामध्ये वसलेली आहेत. रस्तेदेखील अरुंद आणि उंच घाटमाथ्याचे आहेत. यामुळे सीएनजी बसेस चढताना समस्या उद्भवत आहेत. अनेक वेळा गाडी चढावरील वळणावरच बंद पडत आहेत. यामुळे अन्य ये-जा करणार्या वाहनांची अडचण होत आहे. शिवाय, गाडीतील प्रवाशांनादेखील अनेक वेळा पायी जाण्याची वेळ येत आहे.
किल्ले रायगड परिसरात असलेल्या रायगड आणि सांदोशी या ठिकाणी जाणार्या बसेस कोंझर घाट आणि सांदोशी घाट मार्गावर अनेक वेळा एसटी बसेस बंद पडल्यामुळे नागरिकांना तसेच प्रवाशांना त्रास सहन करावा लागला आहे. दोन बसेसमधून शालेय विद्यार्थीदेखील प्रवास करतात. या विद्यार्थ्यांनादेखील पायी चालत जाण्याची वेळ येत आहे. यापूर्वी सुरू असलेल्या डिझेलवरील गाड्या या घाट मार्गावर कधीच बंद पडत नव्हत्या. मात्र, सध्या अस्तित्वात असलेल्या सीएनजी बसेस सातत्याने बंद पडत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.
शिवसेना पक्षाचे पाचाड वाळण उपविभाग प्रमुख बाळकृष्ण जाधव यांनी याबाबत सांगताना सीएनजी बसेस सातत्याने बंद पडत असल्याने ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागतो. मात्र, केलेल्या तक्रारीकडे एसटी महामंडळाचे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. याबाबत बाळकृष्ण जाधव यांनी या मार्गावर सीएनजी बसेसऐवजी डिझेल बसेस सुरू केल्या जाव्या, अशी मागणी करणारे निवेदन महाड एसटी आगाराचे आगाराप्रमुख फुलपगारे यांना दिले आहे.