| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल विधानसभा मतदारसंघात गुरुवार अखेरपर्यंत 1 लाख 50 हजार मतदारांचे आधार व्हेरिफिकेशन पूर्ण झाले आहे. तर 190 उरण विधानसभा मतदारसंघातील पनवेल भागात 24 मतदान केंद्रे असून 60 हजार मतदारांचे आधार व्हेरिफिकेशन पूर्ण झालेले आहे. याप्रमाणे पनवेल तालुक्यात 2 लाख 10 हजार मतदारांचे आधार व्हेरिफिकेशन पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे पनवेल तालुक्यात आतापर्यंत 30 टक्के आधार जोडणीचे काम पूर्ण झालेले आहे. नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदविल्यास हे काम लवकर पूर्ण होईल. या अनुषंगाने नागरिकांनी मतदान कार्ड आधारला लिंक करावे, असे आवाहन पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांनी केले आहे.
तहसीलदार विजय तळेकर पुढे म्हणाले, भारत निवडणुक आयोग यांच्या निर्देशांन्वये मतदार यादीमधील मतदारांची ओळख आणि छाननी सुरू आहे. सदरचा कार्यक्रम 1 ऑगस्ट 2022 पासुन संपुर्ण भारतभर सुरू झालेला आहे. 188 पनवेल विधानसभा मतदासंघामध्ये मतदार यादीचे शुध्दीकरण करण्याच्या दृष्टीने जे मतदार आहेत त्यांचे आधार नंबर मतदार यादीस लिंक करणे किंवा आधार नंबर नसल्यास इतर ओळखपत्र मतदार यादीला लिंक करण्याचे काम सुरू आहे. मतदार यादीचे शुध्दीकरण करणे हा याचा उद्देश आहे. तरी सर्व नागरिकांना पनवेल प्रशासनाच्यावतीने विनंती करतो की जास्तीत जास्त प्रमाणात सहभाग घ्यावा.
याचबरोबर नॅशनल वोटर पोर्टल आणि वोटर हेल्पलाईन आणि इआरओ नेट अश्या वेगवेगळ्या माध्यमातून नागरिकांना आधार नंबर लिंक करता येईल. ज्या नागरिकांना ऑनलाईन लिंक करणे अवघड आहे त्यांच्यासाठी ऑफलाईन सुविधा देखील आहे. यामध्ये 6ब चा फॉर्म भरून बीएलओ मार्फत तहसीलदार कार्यालयात दिला तरी आधार लिंक होईल. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी यात सहभाग नोंदवावा असे आवाहन तहसीलदार विजय तळेकर यांनी केले आहे.
नागरिकांना स्वतः देखील व्हेरिफिकेशन करता येते किंवा त्यांच्या परिसरातील बीएलओ मार्फत करता येईल किंवा तहसीलदार कार्यालयातील निवडणूक विभागातून देखील करता येईल. निवडणूक आयोगाने गरुडा नावाचे मोबाईल अँप तयार केले आहे, हे कोणत्याही अँड्रॉइड फोनवर डाऊनलोड करता येते. या अँप मधून देखील आधार नंबर लिंक करता येतो.
मतदार यादीला आधार क्रमांक लिंक करणे ही मोहीम भारत निवडणुक आयोगाने संपूर्ण भारतभर हाती घेतलेली आहे. मतदार यादीला आधार क्रमांक जोडणीसाठी जास्तीत जास्त नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा. हे ऐच्छिक काम असले तरीदेखील मतदार यादी शुध्दीकरण करणे हा यामागील महत्वाचा उद्देश आहे. ज्याठिकाणी आधार क्रमांक नसेल त्याठिकाणी निवडणूक ओळखपत्र,पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन, पासपोर्ट यासारखे ओळखीचे पुरावे अथवा कोणत्याही विभागाचे ओळखपत्र अपलोड करता येऊ शकते. त्यामुळे या मोहिमेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे.
राहुल मुंडके,प्रांत