| मुंबई | प्रतिनिधी |
राज्यातील सत्तासंघर्षाचा निर्णय घेण्यासाठी विधानसभाध्यक्ष अॅड.राहुल नार्वेकर यांनी शिंदे समर्थक तसेच ठाकरे गटाच्या आमदारांना नोटीस पाठविली आहे. यामुळे 16 आमदारांच्या अपात्रेसंदर्भातील निर्णय येत्या काही दिवसात घेतला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या घटनेची प्रत विधानसभा अध्यक्षांना पाठवल्यानंतर राहुल नार्वेकरांनी कार्यवाही सुरु केली आहे. शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेविषयी नोटीस जारी करण्यात आली आहे. दोन्ही पक्षांच्या आमदारांना त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे. नार्वेकर यांनी शिवसेनेच्या 40 आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 14 आमदारांना ही नोटीस जारी केली आहे.
सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचं प्रकरण गेलं तेव्हा न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्याची जबाबदारी विधानसभा अध्यक्षांवर सोपवली आहे. आपण शिवसेनेच्या घटनेचा अभ्यास करुन यावर निर्णय घेऊ असं नार्वेकर यांनी म्हटलं होतं. त्यानुसार त्यांनी निवडणूक आयोगाकडे शिवसेनेच्या घटनेची मागणी केली होती. निवडणूक आयोगाने ही प्रत त्यांना पाठवली आहे. शिवसेनच्या घटनेच्या आधारे हा निर्णय घेण्यात येणार आहे. शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून एकमेकांच्या आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय गघेण्यात आला आहे. यावेळी आमदारांना पुराव्यांसह प्रतिज्ञापत्र सादर करावं लागणार आहे.