आपदा मित्र ठरले देवदूत! अकराशे जणांचा जीव वाचविण्यासाठी बाजी

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

पुराच्या लोंढ्यात अडकलेले जीव, डोंगरकड्यांवरून कोसळणाऱ्या दरडी आणि डोक्यावर घोंघावणारे संकट… अशा आपत्कालीन प्रसंगात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मदतीसाठी धावून जाणारे रायगडचे आपदा मित्र अनेकांसाठी अक्षरशः देवदूत ठरले आहेत. गेल्या तीन वर्षांत पूर, दरड आणि अतिवृष्टीच्या संकटात तब्बल अकराशे जणांना वाचविण्यासाठी या आपदा मित्रांनी जीवाची बाजी लावली आहे.

निसर्ग चक्रीवादळ, तौक्ते वादळ आणि त्यानंतर महाड-पोलादपूरमध्ये 2021 मध्ये झालेल्या दरडीच्या घटनांनी रायगडमध्ये मोठी हानी केली. वादळामुळे वीजतारा, वीजखांब आणि रोहित्रे उखडून पडली. अलिबाग, मुरूड आणि श्रीवर्धनसह अनेक भागांना मोठा फटका बसला. किनारपट्टीवरील सुपारीच्या बागांचे मोठे नुकसान झाले, तर आंबा-काजूच्या बागाही उद्ध्वस्त झाल्या. एक लाखांहून अधिक नागरिकांना वादळाचा थेट फटका बसला असून, हजारो घरांची छपरे व पत्रे उडून गेली होती.

या आपत्तींच्या पार्श्वभूमीवर स्थानिकांच्या मदतीने आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तीन वर्षांपूर्वी आपदा मित्रांची निवड केली. प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून काम करण्यासाठी 18 ते 40 वर्षे वयोगटातील स्थानिकांना या उपक्रमात सहभागी करून घेण्यात आले. जिल्ह्यात 300 आपदा मित्रांची निवड करून महाड, माणगाव, पनवेल आणि पेण येथे त्यांना प्रशिक्षण देण्यात आले. यात तरुणांसह महिलांचाही सहभाग आहे.

अतिवृष्टी, पूर किंवा दरडीच्या प्रसंगी गरजूंना मदत करण्याबरोबरच आपद्ग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याची जबाबदारी आपदा मित्र पार पाडत आहेत. गेल्या तीन वर्षांत जून-जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीदरम्यान अनेक भागांत पूर आणि दरडी कोसळल्या. अशा वेळी आपदा मित्रांनी धोकादायक परिस्थितीत धाव घेत अनेकांना सुरक्षित बाहेर काढले. आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाच्या माहितीनुसार, आतापर्यंत सुमारे एक हजार शंभर जणांना वाचविण्यासाठी आपदा मित्रांनी प्रयत्न केले आहेत. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता संकटात सापडलेल्यांना आधार देणाऱ्या या तरुणांमुळे रायगडमध्ये आपदा मित्रांचा उपक्रम खऱ्या अर्थाने जीवनदायी ठरला आहे.

Exit mobile version