वावोशीतील पीएनपीच्या शाळेत वर्ग सुरू
| अलिबाग | प्रतिनिधी |
मुलांना मोठ मोठी आकडेमोड तोंडी करता यावी, फक्त बेरीज-वजाबाकी नाही तर चार ते पाच अंकी आकड्यांचा गुणाकारसुद्धा काही सेकंदात मुले तोंडी करू शकतील अशा पद्धतीचे शिक्षण मंगळवार, दि. 22 ऑगस्टपासून पीएनपी इंग्लिश मीडियम स्कूल, वावोशी शाळेत पाठ्यक्रमामध्ये अबॅकस व वैदिक गणित सुरू करण्यात आले आहे.
अबॅकस व वैदिक गणित विद्यार्थ्याला शाळेच्या वेळेतच शिकविण्यात येणार असल्याची माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका पूनम फुलारी यांनी दिली. या शिक्षणासाठी वार्षिक फी अत्यंत माफक म्हणजेच फक्त रु. 1640/- आकारण्यात येणार आहे. इतक्या अल्प दरात अबॅकस व वेदिक गणिताचे शिक्षण फक्त पीएनपी शाळेतच मिळायला लागल्याने विद्यार्थ्यांसह पालकवर्गातून त्याचे स्वागत होताना दिसत आहे. अबॅकस व वैदिक गणित वर्गात शाळेतील नर्सरी ते इ.10 वीमधील एकूण 60 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. संस्थेच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील यांची तळमळ होती की, आपल्या संस्थेतील वावोशीमधील विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या शैक्षणिक सोयी उपलब्ध करून देता आल्या पाहिजेत. अबॅकस व वैदिक गणित शिकविण्यासाठी प्रशिक्षित व अनुभवी शिक्षक खास मुंबईहून येत आहेत, त्यामुळे पीएनपी इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल असणार आहे, असे मुख्याध्यापिका फुलारी यांनी सांगितले.
संस्थेच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील यांनी अशा पद्धतीचा अभ्यासक्रम कसा मिळविता येईल याचा ध्यास घेतला होता. त्यामुळेच हा योगायोग जुळून आला आहे. अबॅकस व वैदिक गणित हा अभ्यासक्रम आता शाळेमध्ये सुरू करण्यात आल्याने विद्यार्थी व पालकवर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
पूनम फुलारी, मुख्याध्यापिका, पीएनपी स्कूल, वावोशी