राज्यातील व्यापार्‍यांना ‘अभय’

दहा हजार रुपयांची थकबाकी माफ; अर्थमंत्री अजित पवार यांची घोषणा
। मुंबई । वृत्तसंस्था ।

कोरोना संकटकाळात अडचणीत आलेल्या उद्योग, व्यापार क्षेत्राला अडचणीतून बाहेर काढून उभारी देण्यासाठी उपमुख्यमंत्री तसेच राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी ‘महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क तडजोड-2022’ अभय योजना मंगळवारी विधिमंडळात जाहीर केली. कर कायद्यांतर्गत एका वर्षात वैधानिक आदेशान्वये दहा हजार रुपयांची थकबाकी असल्यास या थकबाकीची रक्कम संपूर्णपणे माफ करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितले.

यासंदर्भातील विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंगळवारी मंजूर करण्यात आले. या योजनेसंदर्भात माहिती देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, वस्तू व सेवा कर अस्तित्वात येण्यापूर्वी विक्रीकर विभागातर्फे राबविण्यात येणार्‍या विविध करांसंदर्भातील ही योजना असून, या योजनेंतर्गत आवश्यक रकमेचा भरणा करण्यासाठी 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर 2022 पर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. कर कायद्यांतर्गत एका वर्षात वैधानिक आदेशान्वये दहा हजार रुपयांची थकबाकी असल्यास सदर थकबाकीची रक्कम संपूर्णपणे माफ करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. या घोषणेचा लाभ छोट्या व्यापार्‍यांना सुमारे एक लाख प्रकरणांमध्ये होणार आहे.

अभय योजना पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीनं आणि पारदर्शकपणे राबवण्यात येणार असून, कोरोना संकटानं अडचणीत आलेल्या उद्योग व व्यापार क्षेत्राला अडचणीतून बाहेर काढण्यात, उभारी देण्यात ही योजना महत्त्वाची भूमिका बजावेल, तसंच योजनेला उद्योग व व्यापार क्षेत्राकडून चांगला प्रतिसाद मिळेल.

अजित पवार, अर्थमंत्री
Exit mobile version