। मुंबई । प्रतिनिधी ।
एसटी कर्मचार्यांच्या वेतनासाठी एसटी महामंडळाने 600 कोटी रुपयांची मदत राज्य शासनाकडे मागितली होती. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानंतर एसटी महामंडळाला 500 कोटी तातडीने वितरित करण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यभरातील 98 हजार एसटी कर्मचार्यांना वेतनाचा प्रश्न सुटणार आहे.
चालू आर्थिक वर्षासाठी 1450 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतूदीपैकी 838 कोटी रुपयांचा निधी एसटीला आधीच वितरित केला असून उर्वरीत 612 कोटींपैकी 500 कोटी रुपये तातडीने एसटी महामंडळाला देण्यात यावेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. त्यानंतर तातडीने हा निधी वितरित करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार निधी वितरित झाल्याने एसटी कर्मचार्यांचे वेतन तसेच महामंडळाचे आर्थिक प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.