मसाल्याचे पदार्थ खरेदी करण्यासाठी गृहीणींची लगबग

। खांब-रोहे । वार्ताहर ।
मसाल्याचे विविध प्रकारचे पदार्थ खरेदी करण्यासाठी सध्या बाजारात गृहीणींची एकच लगबग सुरू झाली असल्याचे दिसून येत आहे. गत दोन वर्षापुर्वी कोरोना महामारीचे पार्श्‍वभूमीवर घरगुती मसाल्यापेक्षा बाजारात तयार मिळणारा मसाला खरेदी करण्यावर सर्वसामान्यांनी प्राधान्य दिले असल्याचे दिसून आले. कोरोना महामारी कालावधीत सर्वच बाबतीत विस्कळीतपणा येऊन जनजिवनावरही त्याचा परिणाम जाणवू लागला होता. परंतू या वर्षी मात्र परिस्थिती पूर्णपणे बदलल्याने पैशांची तजवीज करून वर्षभर लागणारे मसाल्याचे पदार्थ खरेदी करीत असतानाची त्यांची लगबग दिसून येत आहे.

बाजारात मिळणारे विविध कंपन्यांचे तयार मसाले परवडत नसल्याने मिरची खरेदी करून त्याचा मसाला बनविण्यावर गृहीणींचा कल दिसून येतो. त्यामुळे शंकेश्‍वरी, बेडगी, कश्मिरी, गंटूर, लवंगी, कोल्हापूरी मिरची आदी मिरची खरेदी करणे, त्याचबरोबर धडे, बडीशोप, अख्खा मसाला, जिरे, मोहरी, हळकुंड आदी मसाल्याचे पदार्थ खरेदी करण्यासाठी गृहीणींची एकच लगबग सुरू झाली असल्याचे दिसून येत आहे. रोहे शहरातील मिरची गल्लीत सध्या मिरची खरेदी करण्यासाठी मोठ्या संख्येने महिला येत असताना दिसत आहेत. तर कोरोना महामारी, अधूनमधून कोसळणारा अवकळी पाऊस, मिरचीचे उत्पादनात होणारी घट आदींमुळे गतवर्षापेक्षा यावर्षी मसाल्याचे विविध पदार्थांसह मिरचीचेही भाव वाढले असल्याचे दिसून येत असले तरी दैनंदिन जीवनात मसाल्याचे पदार्थ व मसाले यांची मोठीच आवश्यकता असल्याने किंमती कितीही जरी वाढल्या तरी मसाल्याचे पदार्थ खरेदी करण्याचा उत्साह मात्र कायम आहे.

दिवसेंदिवस सर्वच क्षेत्राला महागाईची झळ बसून महागाई ही वाढतच चालली आहे. अशा परिस्थितीत मसाल्याचे पदार्थांच्या किंमती वाढत चालल्या असल्याने आमच्या आर्थिक बजेटलाही त्याची झळ सहन करावी लागत आहे.

शिल्पा मरवडे, गृहीणी, रोहे
Exit mobile version