पावसाळी वस्तूंच्या खरेदीची लगबग

। अलिबाग । वार्ताहर ।
पावसाच्या आगमनाआधीच छत्र्या, चपला, रेनकोट अशा पावसाळी वस्तूंच्या खरेदीकडे नागरिकांचा कल असतो. तेव्हा जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच पोयनाड बाजारपेठा पावसाळ्यात वापरल्या जाणार्‍या वस्तूंनी सजल्या असून त्यांच्या खरेदीसाठी ग्राहकांची बाजारपेठेतील लगबग वाढली आहे. पावसाळ्यानिमित्ताने रंगीबेरंगी छत्र्या, रेनकोट, आणि नवनवीन डिझाईनच्या पावसाळी चपलांनी सजली आहे. जून महिना उजाडला असूनही पोयनाड आसपासच्या गावात पावसाची प्रतीक्षा असली तरी पावसाळी खरेदीसाठी ग्राहक बाजारपेठेत गर्दी करू लागले आहेत. सध्या पोयनाडमध्ये छत्री विक्रेत्यांकडे 150 ते 700 रुपयांपर्यंत मोठ्या आणि लहान आकाराच्या छत्र्या उपलब्ध आहेत. महिलावर्गाकडून दुमडून ठेवता येणार्‍या छत्र्यांच्या खरेदीला अधिक पसंती मिळत असून त्यांच्या किमती 150 ते 600 रुपयांपर्यंत आहेत; तर लहान मुलांना आवडणार्‍या कार्टूनची चित्रे असणार्‍या छत्र्यादेखील उपलब्ध असून त्यांच्या किमती 80 ते 100 रुपयांपासून सुरू आहेत. शहरातील बाजारपेठेत शूज, सँडल, स्लीपर अशा महिलांच्या पावसाळी चपलांच्या प्रकारांमध्ये यंदा नवनवीन डिझाईन विक्रीसाठी दाखल झाल्या असून महिलांनी जूनच्या सुरुवातीपासूनच पावसाळी चपलांची खरेदी सुरू केली आहे. सध्या महिलांच्या पावसाळी चपला 200 ते 700 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.

Exit mobile version