| मुंबई | प्रतिनिधी |
विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. पहिल्याच दिवशी आमदार अबू आझमी यांनी औरंगजेब याच्यावर एक विधान केले होते. औरंगजेबाचे कौतुक केले होते. यावरुन विधिमंडळात गदारोळ उडाला होता. विरोधी पक्षातील आमदारांसह सत्ताधारी पक्षातील आमदारांनी अबू आझमी यांच्याविरोधात घोषणाबाजी सुरू केली होती. दरम्यान, आज अबू आझमी यांच्याविरोधात विधिमंडळात निलंबनाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. हा प्रस्तान सर्वानुमते मंजूर करण्यात आला असून, अबू आझमी यांचे निलंबन करण्यात आले आहे. सपा आमदार अबू आझमी यांचं निलंबन किती काळासाठी करण्यात यावं यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे. मंत्री चंद्रकांत पाटलांनी विधानसभेमध्ये अबू आझमींच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला.
सुधीर मुनगंटीवार यांनी आपली आक्रमकपणे भूमिका मांडली. यावेळी अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी आवाजी मतदान घेतले. या आवाजी मतदानामध्ये एकमताने ठराव मंजूर झाल्याचे जाहीर केले. अबू आझमी यांना आता अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सहभागी होता येणार नाही. अधिवेशन कालावधी संपेपर्यंत अबू आझमींवर विधानसभेच्या इमारतीच्या आवारात येण्यासही बंदी घालण्यात आली आहे.
समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाची प्रशंसा केल्याच्या मुद्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये मंगळवारी प्रचंड गदारोळ झाला होता. सत्तापक्षाच्या आमदारांनी गोंधळ घालत कामकाज वारंवार बंद पाडले. शेवटी कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. दरम्यान, आता आज आझमी यांच्यावर निलंबणाची कारवाई करण्यात आली आहे. विधानसभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, भाजपचे महेश लांडगे, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री उदय सामंत, अतुल भातखळकर, योगेश सागर यांनी अबू आझमींवर हल्लाबोल केला.