। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील जेएसएम कॉलेजचे माजी प्राध्यापक अविनाश ओक (65) यांनी रेल्वेखाली आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि.5) दुपारच्या सुमारास घडली. पेण रेल्वे स्टेशन येथील रुळावर त्यांचा मृतदेह सापडला. यावेळी ‘माझ्या आत्महत्तेला कोणालाही दोषी धरु नये’, अशी सुसाईड नोट पोलिसांना त्यांच्याजवळ सापडली. पेण येथील सरकारी रुग्णालयात ओक यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले, असल्याची माहिती पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदिप बागुल यांनी ‘कृषीवल’शी बोलताना दिली. ही घटना दुपारी दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास घडली. ही बातमी समजताच ओक यांचे निकटवर्तीय तसेच भाजपचे नेते किरिट सोमय्या पेणमधील रुग्णालयात दाखल झाले. ओक यांच्या पश्चात त्यांची पत्नी, मुलगा, सून आणि मुलगी असा परिवार आहे.
प्रा. ओक यांनी अलिबाग येथील जेएसएम महाविद्यालयामध्ये बरीच वर्ष प्राध्यापक म्हणून काम केले होते. ते अलिबाग-गोंधळपाडा येथे वास्तव्यास होते. पेण येथील गतीमंद मुलांसाठी काम करणारी आयडे केअर ही संस्था आहे. या संस्थेमध्ये ते सेवाभावपणे काम करण्यासाठी जात असत. बुधवारीदेखील ते आयडे केअरमध्ये गेले होते. त्यांनतर आयडे केअरच्या स्वाती मोहिते यांनी त्यांना जेवणासाठी आग्रह केला. मात्र माझे पेणमध्ये काही काम आहे, असे सांगून ते निघून गेले, अशी माहिती स्वाती मोहिते यांनी दिली. त्यानंतर ते दुपारी तेथून निघाले आणि त्यांनी पेण रेल्वे स्टेशन येथे रेल्वेखाली येऊन आत्महत्या केली. त्यावेळी त्यांचा मोबाईल बंद होता. आत्महत्या करण्यामागचे नेमके कारण समोर आले नाही. मात्र पेण पोलीस अधिक तपास करीत आहेत. अलिबाग येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर रात्री उशिरा अत्यसंस्कार करण्यात येणार होते.