यंदाचा हंगाम केवळ 40 दिवसांचा
। नवी मुंबई । प्रतिनिधी ।
यंदा हापूस हंगाम सुरळीत राहील, अशी अपेक्षा होती. परंतु, ऐन फळधारणेच्या कालावधीत हापूसच्या उत्पादनावर संक्रात ओढावली आहे. पाऊस, हवामान बदल, तसेच कडाक्याच्या थंडीने आंब्यावर परिणाम झाला असून, उत्पादन घटले आहे. त्यामुळे यंदा केवळ 35 ते 40 टक्के उत्पादन असेल, अशी माहिती व्यापार्यांनी दिली आहे.
समाधानकारक पाऊस पडल्यामुळे हापूस उत्पादन चांगले असेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र, दुसरीकडे वेळोवेळी हवामानात होणार्या बदलाचा फटका आंब्याला बसला. त्यामुळे अपेक्षित जादा उत्पादनात घट होताना दिसत आहे. मागील वर्षी बाजारात फेब्रुवारी महिन्यात लवकर आवक सुरू झाली होती. तर मार्चमध्ये हंगाम सुरू होउन 40 ते 50 हजार पेट्या दाखल होत होत्या. तर सध्या बाजारात तीन ते साडेतीन हजार पेट्या दाखल होत आहेत. त्यामुळे यावर्षी हापूसचा हंगाम अवघा 35 ते 40 टक्के आहे. तसेच मे अखेर पर्यंत सुरू असणारा हंगाम लवकर संपुष्टात येणार आहे. नेहमी 3 ते 4 महिने हंगाम सुरू असतो. यंदा मात्र, 20 मार्च ते एप्रिल अखेर तसेच काही तुरळक आवक 10 मेपर्यंत राहील, असे मत घाऊक फळ व्यापारी संदेश उतेकर यांनी व्यक्त केले आहे. सध्या बाजारात रत्नागिरी, देवगडचा, रायगडचा हापूस दाखल होत असून, 4-6 डझनची पेटी 3 हजार ते 6 हजार रुपये दराने विक्री होत आहे.
यंदा उत्पादन केवळ 35 ते 40 टक्के आहे. कडाक्याची थंडी, हवामान बदल आणि पाऊस यामुळे उत्पादनाला फटका बसला आहे. उष्णता वाढल्याने फळाच्या दर्जावर परिणाम होत आहे. अशा हवामान बदलाच्या परिस्थितीत आंबा उत्पादकांना उत्पादन काढणे आव्हानात्मक ठरत आहे.
चंद्रकांत मोकाल,
अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक महासंघ