। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालयाची इमारत 45 वर्षे जूनी आहे. ही इमारत जीर्ण झाल्याने रुग्णांसह कर्मचार्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. या ठिकाणी नवीन इमारतीची प्रतिक्षा रायगडकारांना लागून राहिली होती. अखेर या इमारतीच्या बांधकामाच्या भूमीपूजनाला मुहूर्त लागला. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते अलिबागमध्ये बुधवारी (दि.5) सायंकाळी भूमीपूजन झाले. मात्र, या भूमीपूजनाला सत्ताधारी पक्षातील भाजप व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दांडी मारली. त्यामुळे सत्ताधारी पक्षातील भाजप, राष्ट्रवादी व शिंदे गटात आलबेल नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.
या कार्यक्रमाला भाजपचे खा. धैर्यशील पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, आ. महेश बालदी, महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दांडी मारली. फक्त शिंदे गटातील नेतेच या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यामुळे महायुतीमधील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आल्याची चर्चा कार्यक्रमादरम्यान सुरु होती.
सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत अलिबागमध्ये 300 खाटांचे नवीन रुग्णालय उभारण्यात येणार आहे. तळमजल्यापासून सात मजली ही इमारत असणार आहे. या इमारतीच्या बांधकामासाठी 105 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता आहे. या इमारतीचे बांधकाम 17 हजार 800 चौ. मी. इतक्या क्षेत्रफळात आहे. नोंदणी कक्ष, ब्लड बँक, शस्त्रक्रिया सेंटर, अपघात विभाग, अतिदक्षता विभाग, डायलेसिस सेंटर, प्रशासकीय कार्यालय आदी सुविधा असणार आहे. या नविन आंतररुग्ण इमारतीचा भूमीपूजन सोहळा आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी सायंकाळी झाला.
यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, आ.महेंद्र थोरवे, आ.संतोष बांगर, जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निशिकांत पाटील, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शितल जोशी व इतर उपस्थित होते. रायगड जिल्ह्यात सध्या पालकमंत्री पदावरून वाद सुरू आहे. हे पद मिळविण्यासाठी शिंदे गटातील नेते भरत गोगावले आणि राष्ट्रवादीचे तटकरे यांच्यामध्ये शीतयुध्द सुरु आहे. मात्र सर्वच आलबेल असल्याचे बोलले जात असताना भूमीपूजनाच्या कार्यक्रामाला भाजप व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दांडी मारल्याने वेगळ्याच चर्चेला ऊत येऊ लागला आहे.
गोगावलेंच्या निशाण्यावर तटकरे?
रायगड जिल्ह्यातील पालकमंत्री पदाचे बाशिंग बांधून फलोत्पादन मंत्री भरत गोगावले आहेत. मात्र, त्यांना राष्ट्रवादीच्या नेत्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे डोईजड ठरत आहेत. आदिती तटकरे यांना पालकमंत्री पद मिळू नये, यासाठी शिंदे गटातील नेते जिवाची बाजी लावत आहेत. त्यामुळे पालकमंत्री पदाचा वाद गेल्या अनेक दिवसांपासून सुरूच आहे. विधानसभेची निवडणूक कठीण होती. मित्र पक्षाने काय मदत केली, हे विसरून पुढे काम करू, असा टोला भरत गोगावले यांनी नाव न घेता लगावला. त्यामुळे गोगावलेंच्या निशाण्यावर पुन्हा तटकरे असल्याचे दिसून आले आहे.