। खोपोली । प्रतिनिधी ।
आज दि.22 सकाळी 6.00 वा. सुमारास मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर किलोमीटर 39/400 दरम्यान तीन गाड्यांचा अपघात झाला. अपघात भीषण होता, सुदैवाने जीवित हानी झाली नाही. मात्र प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या आणि गाड्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले.
मुंबईकडे जाणारा ट्रक (TN-39-CM-9227) वरील चालक आर. अरुण (36), रा. कर्नाटक याचे ट्रक वरील नियंत्रण सुटल्याने ट्रकचे पुढे जाणाऱ्या आय 20 कार (MH-48-P-3689) ला मागून धडक दिली, त्यानंतर पुढच्या व्हॅगनार कार (MH-12-GK-4286) ला धडक मारून काही अंतर फरफटत नेले. यात कार मधील महिला जखमी झाली. तीला उपचारासाठी MGM हॉस्पिटल पनवेल येथे रवाना केले. अपघातात बाधित झालेल्या दोन्ही कारमधील प्रवाशांनी सीटबेल्ट लावल्याने मोठी हानी टळली, असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.
हा अपघात खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच आय.आर.बी. पेट्रोलिंग टीम, देवदूत यंत्रणा, लोकमान्य ॲम्बुलन्स सेवा, बोरघाट वाहतूक पोलीस, डेल्टा फोर्सचे जवान मदतीसाठी आल्याने मदतकार्य वेळेत पार पडले. बाधित वाहने लागलीच बाजूला काढल्यामुळे वाहतूकही खुली झाली.