दारूच्या नशेत कार चालवून अपघात; चालकासह दोघांवर गुन्हा

| खोपोली | प्रतिनिधी |

दारूचे सेवन करून भरधाव कार चालविताना नियंत्रण सुटल्याने उभ्या कारला धडक देत अपघात केल्याची घटना 4 सप्टेंबर रोजी रात्री 9.20 वाजण्याच्या सुमारास खोपोलीतील शास्त्रीनगर येथे घडली. अपघातानंतर कारच्या नुकसानीबाबत विचारणा केली असता चालकासह त्याच्या साथीदाराने फिर्यादीला शिवीगाळ करून दमदाटी केल्याचा प्रकारही समोर आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चालक हा आपल्या ताब्यातील मारुती सुझुकी स्विफ्ट कार क्रमांक एमएच 46 सीआर 7085 ही आयडीबीआय बँक, खोपोली ते शास्त्रीनगर मार्गावर निष्काळजीपणे व धोकादायक वेगाने चालवत होता. नियंत्रण सुटल्याने कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एमएच 46 बीके 4623 क्रमांकाच्या कारच्या मागील उजव्या बाजूस धडक दिली. या अपघातामुळे उभ्या कारचे नुकसान झाले. त्याबाबत विचारणा केली असता आरोपी चालक व त्याच्या साथीदाराने संगनमत करून फिर्यादीला शिवीगाळ करत दमदाटी केल्याचे तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोहवा चव्हाण अधिक तपास करीत आहेत.

Exit mobile version