भरधाव कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात

। महाड । प्रतिनिधी ।

महाड- दापोली राज्य मार्गावर कुर्ला गायकरवाडी येथे नातू विद्यालयाजवळ अपघात झाल्याची घटना शनिवारी (दि. 20) रात्री अकराच्या सुमारास घडली. दापोलीकडून महाडकडे येणाऱ्या वेगवान कार चालकाचा कार वरील ताबा सुटल्याने कारला झालेल्या अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

महाड- दापोली रस्ता लाटवण हद्दीपर्यंत निसरडा झाला असल्याने या मार्गावरून वाहने संथ गतीने चालवण्याचे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभाग महाड यांच्याकडून बॅनर व प्रत्यक्ष वाहन चालकांना शिरगाव फाट्यावर थांबून करण्यात येते. या मार्गावर मे महिन्यापासूनच अपघातांची मालिका वारंवार सुरूच असतानाच शनिवारी रात्री अकराच्या सुमारास दापोलीकडून महाडकडे वेगाने येणाऱ्या कारचालकाचा कार वरील ताबा सुटल्याने कारला कुर्ला दिवेकर वाडी येथील वळणावर अपघात झाला.

महाड- दापोली मार्गावरील कुर्ला गायकरवाडी जवळील नातू विद्यालयाजवळ यापूर्वी पुणे व महाड एसटी बसचा अपघात झाल्याचे उदाहरण ताजे असताना शनिवारी रात्री अकराच्या सुमारास दापोलीबाजू कडून महाडकडे येणाऱ्या कार चालकाला येथील वळणावरती वेग नियंत्रणात आणण्यात अपयश आल्याने कार 100 मीटर अंतरापर्यंत गोलांट्या उड्या मारत गेल्याचे प्रत्यक्षदर्शनी सांगितले. सुदैवाने या गाडीमधील असणाऱ्या व्यक्तींना किरकोळ स्वरूपाची दुखापत झाली असली तरी हा सर्व प्रकार वेगाने कार चालवण्याने घडल्याचे निष्पन्न होत आहे.

Exit mobile version