हृदयद्रावक! दिवाळीच्या पहिल्याच दिवशी माणगांवमध्ये अपघात; भावाचा मृत्यू, बहिणीने दिली फिर्याद

। अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
सर्वत्र दिवाळीचा पहिला दिवस उत्साहात सुरु असताना जंगम कुटूंबियांची दिवाळी मात्र अंधारमय झाली. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी मुंबई-गोवा महामार्गावर इंदापूर रस्त्यावर झालेल्या अपघातात 25 वर्षीय तेजस जंगम या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि.4) घडली. याप्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुुरुवारी सकाळी 8 वाजल्याच्या दरम्यान पूजा जंगम व तिचा आतेभाऊ तेजस मुंबई- गोवा महामार्गावरुन एमएच 06 सीव्ही 6081 या क्रमांकाच्या दुचाकीने प्रवास करीत होते. यावेळी इंदापूर रस्त्यावरील पूलाजवळ येताच अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटार सायकलला जोरदार धडक दिली. तसेच तेथून पळ काढला. यामध्ये तेजसचा मृत्यू झाला तर बहिण पूजा हिला दुखापत झाली.
ऐन दिवाळीच्या पहिल्याच दिवशी हा अपघात झाल्याने जंगम कुटूंबियांवर दुःखाचा डोंगरच कोसळला आहे. याप्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पीएसआय पाटील अधिक तपास करीत आहेत.

Exit mobile version