| रत्नागिरी | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा महामार्गावरील रुंदीकरणाचे काम सुरू आहे. मात्र महामार्गावर छोट्या-मोठ्या अपघातांची मालिका सुरूच आहे. बावनदी पुलानजिक बुधवारी, (दि.12) रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास सिमेंट वाहतूक करणारा ट्रक थेट खोदलेल्या चरित कोसळला. या अपघातात ट्रकमधील तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या जखमींमध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे.
या महामार्गाचे रुंदीकरणाचे काम सुरू असले तरी वाहतूकीला डोकेदुखी ठरेल असेच, काहीसे काम ठेकेदार एका कंपनीमार्फत करीत आहे. रत्नागिरी येथून सिमेंट भरून देवरुखच्या दिशेने ट्रक घेऊन चालक क्षीनोद शर्मा (50), रा. रत्नागिरी जात होता. बावनदी पुलाजवळ आला असता रस्त्याच्या बाजूलाच खोदून ठेवलेल्या अंदाजे 25 ते 30 फूट खोल चरित ट्रक कोसळून पलटी झाला. समोरून येणार्या गाडीने ट्रकचालकाला हुलकावणी दिल्याने हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातग्रस्त ट्रकच्या एका बाजूचा भाग पूर्णपणे चेपून मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने 25 ते 30 फूट खोल चरित कोसळूनही ट्रक चालकासह कमलेश रावत(42), रा. रत्नागिरी , गुडिया रावत (40), रा. रत्नागिरी असे एकूण तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच हातखंबा महामार्ग पोलिस केंद्राचे सहायक उपनिरीक्षक घाग, हलगी, हेड कॉन्स्टेबल संसारे यांनी जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणीजच्या रुग्णवाहिकेने जखमींना स्थानिकांच्या मदतीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघात प्रकरणी अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.