| पोलादपूर | वार्ताहर |
पोलादपूर तालुक्यातील कापडे गाव हद्दीतील भवानवाडी येथील एका गुरांच्या गोठ्याला बुधवारी (दि.12) रोजी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत वाड्यातील 2 गाई किरकोळ जखमी झाल्या. यामध्ये पेंढा व गवताचे भारे जळून खाक झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, कापडे भवानवाडी येथील प्रविण सकपाळ यांच्या मालकीचा वाडा असून, त्या वाड्यात 2 बैलांसह 2 गाई व चारा गवताचे 30 ते 40 भारे होते. दुपारी अचानक लागलेल्या आगीत दोन गाई किरकोळ जखमी होऊन, रानात पळून गेल्या, तर दोन बैलांना ग्रामस्थांनी अथक प्रयत्न करून गोठ्यातून बाहेर काढले. या आगीत सकपाळ यांचा संपूर्ण वाडा आगीत खाक झाला आहे. या घटनेची माहिती मिळतात ग्रामस्थांनी प्रथम बैलांना बाहेर काढले. त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविले. टँकरद्वारे पाणी मारून आग विझवण्याचा प्रयत्न केला. यानंतर सुमारे अर्धा तासाच्या वेळेनंतर अग्निशमनची गाडी घटनास्थळी पोहाचली. यानंतर आगीवर नियंत्रण मिळवले, मात्र तोपर्यंत संपूर्ण वाडा जळून खाक झाला होता. तालुक्यातील स्वतंत्र अग्निशमन केंद्र असणे या आगीनंतर पुन्हा अधोरेखित झाले आहे.