कशेडी घाटात इनोव्हा-एसटी बसचा अपघात

। पोलादपूर । वार्ताहर ।
पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाटात चोळई आणि धामणदिवी गावांच्या हद्दीत दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास इनोव्हा कर व बसच्या अपघातात तीन प्रवासी जखमी झाले. बंद रस्त्यावरून मार्गिका बदलण्यापूर्वी एल अ‍ॅन्ड टीच्या बॅरिकेटस नसल्याने इनोव्हा कार आणि एस.टी.बसची टक्कर झाली.

मुंबईकडून विठ्ठलवाडी, चिपळूण ही एसटी बस कशेडी घाटातील धामणदिवी या गावाजवळील एका मार्गिकेवरून दुसर्‍या मार्गिकेवर जात असताना दोन मार्गिकांमध्य बॅरिकेटस नसल्याने मुंबईच्या दिशेने जाणार्‍या इनोव्हा कारला बसची धडक बसली. या अपघातात इनोव्हा कारमधील तिघे जण जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

अपघाताची माहिती मिळताच मृत्यूंजय दूत नूरी पालोजी यांनी त्यांच्या क्रेन व सहकार्‍यांसह अपघातस्थळी धाव घेतली. यावेळी पोलादपूर पोलिसांनीही तातडीने घटनास्थळी जाऊन जखमींना तातडीने अपघातग्रस्त वाहनातून बाहेर पोलादपूर ग्रामीण रूग्णालयामध्ये दाखल केले.

Exit mobile version