कशेळे-खांडस रस्त्यावर अपघात

। नेरळ । वार्ताहर ।

कशेळे-खांडस रस्त्यावर पुणे येथील पर्यटकांच्या वाहनास अपघात घडला. या अपघातात एक प्रवासी गंभीर जखमी असून, दोन किरकोळ जखमी झाले आहेत. समोरून आलेल्या दोन मोटारसायकलचा अंदाज न आल्याने रिक्षा चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि रिक्षा रस्त्याच्या कडेला असणार्‍या खड्ड्यात उलटली. जखमींना पनवेल एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे पर्यटक पुणे देहू रोड येथून आल्याचे प्राथमिक माहितीत समजले.

कर्जत तालुका हा पर्यटन दृष्टीने फार्महाऊसचा तालुका म्हणून ओळखला जातो. विकेंडच्या काळात पुणे-मुंबई येथून पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. शनिवारी (दि. 9) जून रोजी पुणे देहू रोड येथील प्रवासी पर्यटक कर्जत तालुक्यातील दुर्गम भागातील कशेळे खांडस याठिकाणी फिरण्यासाठी आले होते. दरम्यान, पर्यटकांनी आणलेली ऑटो रिक्षा या वाहनात चालक, तर दोन प्रवासी असे एकूण तीन मित्र होते. फार्महाऊसवर निघालेले हे पर्यटक कशेळे खांडस रस्त्यावरील अकॅडमी ऑफ डेव्हलपमेंट सायन्स संस्थेच्या ज्ञानानुभव विद्यालय येथे आले असता रिक्षाला अपघात घडला. समोरून आलेल्या दोन मोटारसायकलचा वळणावर अंदाज न आल्याने वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि वाहन थेट रस्त्याच्या कडेला खड्ड्यात उलटून अपघात घडला. यामध्ये रिक्षाच्या मागील सीटवर बसलेल्या 58 वर्षीय सुरेश दगडू वाघमारे या प्रवाशाच्या डोक्याला जबर मार लागल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता. तर, चालक आणि अन्य दोन साथीदार हे अपघातात किरकोळ जखमी झाले होते. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Exit mobile version