लांजा-दाभोळे मार्गावर अपघात

चालकासह क्लिनर जागीच ठार

। रत्नागिरी । प्रतिनिधी ।

लांजा-दाभोळे मार्गावर सोमवारी (दि.12) भरधाव वेगाने चिरा वाहतूक करणारा ट्रक रेल्वे पुलाजवळ जाऊन धडकल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात ट्रक चालक व क्लिनर जागीच ठार झाले आहेत.

ट्रकचालक कमलाकर भागप्पा केंगार (28) रा.जत-सांगली हा ट्रकमधून चिरा घेऊन चालला होता. सोमवारी साडेआठच्या सुमारास लांजा ते दाभोळे मार्गावर तळवडे गाव हद्दीतील रेल्वे पुलावरील रस्त्याची परिस्थिती लक्षात न घेता चालकाने ट्रक चालवल्याने तो रेल्वे पुलावर धडकला. यात चालक कमलाकर केंगार यांच्यासह क्लिनर कमलाकर शिवराम गेजगे हे दोघे जागीच ठार झाले. या अपघाताची नोंद लांजा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देसाई हे करत आहेत.

या अपघाताच्या पार्श्‍वभूमीवर लांजा-आसगे-तळवडे-दाभोळे मार्ग चिरा वाहतुकीसाठी त्वरित बंद करण्याचे आदेश द्यावेत, असे निवेदन जिल्हाधिकारी यांना स्थानिक नेत्याकडून देण्यात आले आहे. या रस्त्यावर अवजड वाहनांची सतत वाहतूक असते. बारा, चौदा, सोळा चाकी ट्रकमधून मोठ्या प्रमाणात चिर्‍याची वाहतूक केली जाते. दिवसेंदिवस या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे. या रस्त्यावरून अवजड वाहनातून क्षमतेपेक्षा जास्त चिर्‍याची वाहतूक केली जात असल्याचे याआधीही संबंधित यंत्रणेकडे वारंवार तक्रारी केल्या असूनही कोणतीही कार्यवाही झालेली नाही.

Exit mobile version