मुंबई-गोवा महामार्गावर अपघात; 1 जागीच ठार, तर 1 गंभीर जखमी

संतप्त नागरिकांचा रास्ता रोको
। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।
मुंबई-गोवा महामार्गावर दुचाकी व चारचारी वाहनांचा भीषण अपघात घडला असून, या अपघातात एकजण जागीच ठार तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर कुडाळातील संतप्त नागरिकांनी रास्ता रोको केला.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, औंरगाबाद येथील प्रवासी चारचाकी वाहनाने गोव्यावरुन मालवणच्या दिशेने जात होते. ते सायंकाळी कुडाळ आरएसएन हॉटेलकडे आले असता त्यांची मोटार व दुचाकीत भीषण अपघात झाला.
या अपघातात दुचाकीवरील भूषण देसाई हे जागीच ठार झाले. ते पाट विद्यालयात संगणक विभागात काम करीत होते. तर मंगेश वाईरकर हे गंभीर जखमी झाले. घटनास्थळी पोलीस अधिकारी सागर शिंदे यांनी भेट देऊन पंचनामा केला.
आरएसएन हॉटेलसमोर सुरक्षिततेबाबत कोणतीही पर्यायी व्यवस्था नसल्याने गेल्या काही दिवसात सातत्याने याच ठिकाणी भीषण स्वरूपाचे अपघात झाले आहेत. या अपघाताने त्यात अधिक भर पडली आहे. यामुळे कुडाळातील संतप्त नागरिकांनी काही कालावधीसाठी रास्ता रोको करत, आवश्यक ती भूमिका घेण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.

Exit mobile version