मुंबई-गोवा महामार्गावर अपघात; तरुणीचा मृत्यू

। महाड । प्रतिनिधी ।

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर एसटी बस आणि मोटारसायकलचा अपघात झाला. या अपघातामध्ये मोटारसायकलवरील तरुणीचा मृत्यू झाला, तर अन्य एक जण जखमी झाला आहे. सदरचा अपघात हा रविवारी (दि.28) दासगाव हद्दीतील निसर्ग हॉटेलसमोर सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडला. छाया शंकर हिळम असे मृत तरुणीचे नाव आहे.

नितेश शंकर हिळम आणि त्याची बहीण छाया शंकर हिळम, दोघे राहणार टोळ हे मोटारसायकलवरून महाड ते टोळ असा प्रवास करत होते. दासगाव हद्दीत आले असता गोरेगाव-महाड एसटी बस आणि मोटारसायकल यांची समोरासमोर धडक बसली. अपघातानंतर मोटारसायकलवरील दोन्ही जखमींना ग्रामस्थांनी महाड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले असता उपचारदरम्यान छाया हिचा मृत्यू झाला, तर जखमी नितेश याला अधिक उपचारासाठी माणगाव सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले.

दरम्यान, मोटारसायकलस्वारास वाचवण्याच्या प्रयत्नात एसटी चालकाने बस रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या दुभाजकावर चढवली. या अपघातामध्ये बसचा नादुरुस्त दरवाजा अडकल्याने सर्व प्रवासी काही काळ बसमध्येच अडकून पडले होते. नंतर संकटकालीन दरवाजाच्या सहाय्याने सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. अपघातामुळे महामार्गावर काही कालावधीसाठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. मात्र, महामार्ग वाहतूक पोलीस आणि महाड शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. या अपघाताची नोंद महाड शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Exit mobile version