तळा-इंदापूर रस्त्यावर अपघात

| तळा | वार्ताहर |

तळा-इंदापूर रस्त्यावर सोनसडे गावच्या हद्दीत एक्सयूव्ही कारने अल्टो कारला धडक दिल्याने अपघात घडला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, तळा इंदापूर रस्त्यावर मुसळधार पावसामुळे वाहनचालकांची मोठी तारांबळ उडाली आहे. या रस्त्यावर पाणी जाण्यासाठी कोणत्याही प्रकारची गटारे बांधण्यात आली नसल्याने पावसाचे पाणी रस्त्यावरच साठत आहे. त्यामुळे वाहन चालकांना या पाण्यातून प्रवास करावा लागत आहे. तसेच, सोनसडे येथे रस्त्यालगत लाल मातीची डोंगरे असून पावसामुळे ही लाल माती मुख्य रस्त्यावर येऊन पाण्यात साचून राहते. यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांचे नियंत्रण सुटून वाहने कोठेही जाऊन धडकण्याचे प्रमाण वाढले आहे. याच रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या एक्सयूव्ही कार चालकाचे पाण्यात साचून राहिलेल्या लाल मातीवरून गाडी चालविल्याने नियंत्रण सुटले व ही कार अल्टो कारला जाऊन धडकली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे सदर रस्त्यालगत गटारे काढण्याची मागणी वाहन चालकांकडून करण्यात येत आहे.

Exit mobile version