| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत चौक राज्यमार्गावर बुधवारी (दि.11) एसटी बसने इर्टिगा गाडीला धडक दिली होती. या अपघातात इर्टिगा गाडी चालक रिंकू सिंह तसेच सोबत असलेल्या एका कामगार मित्राला जबर अपघात झाला होता. गेली दहा दिवस रिंकू सिंह हा मृत्यूशी झुंज देत होता. मात्र, त्याची झुंझ अपयशी ठरली असून त्याचा गुरूवारी (दि.19) उपचारादम्यान दुर्दैवी मृत्यू झाला.
नेरळ येथील रिंकू सिंग बुधवारी आपल्या कामगाराला सोबत घेऊन एर्टिगा गाडीने वांगणी येथून चौककडे चालला होता. त्यावेळी समोरून येणाऱ्या एसटीने ओव्हरटेक करीत असताना रिंकू सिंह यांच्या एर्टिगा गाडीला जोरदार धडक दिली. या अपघातात रिंकू सिंह हा गंभीर दुखापतग्रस्त झाल्याने त्याला रायगड हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी पनवेल येथील हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. परंतु, रिंकू सिंग यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत नसल्याने त्याला मुंबई येथील केईएम रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, त्याठिकाणी उपचार सुरू असताना रिंकू सिंह याचा गुरूवारी दुर्दैवी मृत्यू झाला.
दरम्यान, ज्या कर्जत आगाराच्या एसटीने रिंकू सिंह यांच्या गाडीला अपघात केला त्या बस चालकावर अद्यापही कोणती कारवाई झाल्याची माहिती समोर आलेली नाही. तसेच, उपचारादरम्यान रिंकू सिंह याची साधी चौकशी सुद्धा महामंडाकडून केली गेली नाही. त्यामुळे तीव्र वळणावर ओव्हरटेक करण्याच्या नादात एकाचा बळी घेणाऱ्या या एसटी चालकावर कारवाई होणार की नाही, असा प्रश्न रिंकू सिंह यांच्या कुटुंबियांसह स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.
अपघातग्रस्त तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू
