| रसायनी | वार्ताहर |
दांड-आपटा रस्त्यावर महानगर गॅसच्या लाईनच्या कामामुळे रसायनीकर त्रस्त झाले असून, या गॅसच्या लाईनच्या कामामुळे ठिकठिकाणी अपघात होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे.
दांड रसायनी रस्त्यावरील रिस, गुरूद्वार, मोहोपाडा याठिकाणी महानगर गॅसच्या लाईनचे काम चालू असून, वाहनचालकांना या रस्त्यावरुन वाहन चालविताना समस्या निर्माण झाल्याने अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. सायंकाळनंतर बाईकस्वारांच्या अपघातात वाढ झाली असून, अनेकांना गंभीर दुखापती झाल्या आहेत. तर, सेबी वळणावरही रस्त्याच्या मोरीचे काम सुरु आहे. या कामामुळे एका तरुणाला आपला जागीच जीव गमवावा लागला आहे. तर, या कामामुळे सेबीवरुन येणारी वाहने तसेच मोहोपाड्याहून चांभार्लीकडे जाणारी वाहने यांना वळण असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
महानगर गॅसच्या कामामुळे ठिकठिकाणी खोदून ठेवल्यामुळे रस्त्याची पूर्णतः दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहन चालकांना वाहतूक कोंडी होत असून, येथून मार्ग काढणे वाहन चालकांना जिकिरीचे झाले आहे. त्यामुळे नागरिकांकडून महानगर गॅसबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.