Neral Crime News: अल्पवयीन मुलावर गोळीबार प्रकरणातील आरोपींना अटक

नेरळ पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

। नेरळ । प्रतिनिधी ।

नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील जांभूळवाडी येथे एका अल्पवयीन मुलाला छडीच्या बंदुकीतून सुटलेली गोळी लागल्याने हा मुलगा जखमी झाला होता. या प्रकरणी नेरळ पोलिसांनी छडीची बंदूक आणि बेकायदा हत्यार वापरणाऱ्या तिघांना ताब्यात घेतले. ही घटना बुधवारी (दि.3) घडली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

नेरळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. जखमी हेमंत रामदास सराई हा त्याच्या घराबाहेर खेळत असताना कोणीतरी अज्ञात इसमाने जंगलातील प्राण्यांची शिकार करण्याकरीता बंदुकीतील बार मारल्यानंतर त्यातील छरे हेमंत रामदास सराई यांच्या दोन्ही मांडयांना व दोन्ही हातांना, चेहऱ्याला लागून दुखापत झाली. त्यानंतर या तरुणाला तात्काळ उल्हासनगर येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले. नेरळ पोलीस ठाणे येथील प्रभारी अधिकारी राहुल वरोटे यांनी वरिष्ठांच मार्गदर्शन घेऊन आपल्या गुन्हे प्रकटीकरण टिमकडे या गुन्ह्याचा तपास लावण्याचे आदेश दिले. पोलीस उप निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक सुशिल काजरोळकर तसेच पोलीस उपनिरीक्षक एस.एस. शेंबडे, पोलीस उपनिरीक्षक आर.एन. वसावे आणि पोलीस हवालदार राजाराम पिंगळे, महेश खंडागळे, सचिन वाघमारे, निलेश कोंडार, पोलीस अंमलदार राजेभाऊ केकाण, आशु बेद्रे, विनोद वांगणेकर, कुशल काळेख या गुन्ह्याचा तपास लावण्यासाठी तांत्रिक माहिती आणि गुप्तहेर यांचा आधार घेऊन आरोपींना जेरबंद केले.

या गुन्ह्याच्या तपासात जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे आणि उप अधीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटिकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी गोपनीय बातमीदारामार्फत व तांत्रिक तपासाच्या आधारे अनोळखी आरोपी यांचा शोध घेतला असता जांभुळवाडी येथील चंद्रकांत दाजी केवारी (27) व हऱ्याचीवाडी येथील कृष्णा जानू पादीर (25) व मधुकर नामदेव सराई (26) यांना या गुन्ह्यात अटक केली.

गुन्ह्याच्या तपासादरम्यान आरोपींकडून त्यांनी गुन्हा करतेवेळी बेकायदेशीर विनापरवाना वापरलेल्या दोन ठासणीच्या बंदुका हस्तगत करून उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे.

Exit mobile version