अलिबाग पोलिसांनी 10 मिनिटांत केले जेरबंद
। अलिबाग । भारत रांजणकर ।
30 जानेवारी रोजी पेण पोलीस कोठडीतून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळालेला आरोपी बिरू महतो याने अलिबाग जिल्हा कारागृहातूनही 35 फूट दगडी तटबंदीवरून पळून जाण्याचा पुन्हा प्रयत्न केला; मात्र तोही अयशस्वी झाला. दगडी भिंतीवरून उडी मारल्याने त्याचा पाय फ्रॅक्चर झाला आहे.
अलिबाग पोलिसांनी दहा मिनिटात आरोपी बिरू याचा शोध घेऊन अटक केली. याबाबत अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 31 जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली.पेण पोलीस ठाण्यातील कोठडीत हाफ मर्डरबाबत बिरू महतो अटक होता. 30 जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी बिरू याला शौचालयाला बाहेर काढले. यावेळी बिरू याने पोलिसांची नजर चुकवून बाजूच्या भिंतीवरून पलायन केले.
या प्रकाराने पोलिसांची धावपळ सुरू झाली. अखेर बारा तासाने आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले. त्यानंतर आरोपीची पोलीस कोठडी संपली असल्याने 31 जानेवारी रोजी पेण न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सूनावल्याने आरोपीला अलिबाग येथील जिल्हा कारागृहात आणले.सायंकाळी सात वाजता कारागृह अंमलदाराला धक्का देऊन आरोपी बिरू याने कारागृहाच्या 35 फूट दगडी तटबंदीवरून उडी मारून पलायन केले. त्यामुळे कारागृहात खळबळ माजली. कारागृह पोलीस प्रशासनाने तातडीने याबाबतची वर्दी अलिबाग पोलीसांना दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अलिबाग पोलिसांनी तात्काळ कोँबिंग ऑपरेशन सुरु केले.
कारागृहालगतच्या परिसराची झाडाझडती सुरु करण्यात आली. दहा मिनिटातच एका घरामागील सरपण ठेवण्याच्या जागेत तो लपलेला आढळून आला. या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात आरोपी बिरू महतो याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक शैलेश सणस करत आहेत.