विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाई

| नवी मुंबई | प्रतिनिधी |

हेल्मेट न वापरल्याने अपघातांत मरण पावणाऱ्यांची दुचाकीस्वारांचे प्रमाण खूप असल्यामुळे हेल्मेटसक्ती असली तरी अनेक दुचाकीस्वार विनाहेल्मेट सुसाट वाहने चालवत आहेत. नवी मुंबई आरटीओने एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांत तब्बल 2 हजारांहून अधिक विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाई केली असून एक हजार 76 व्यक्तींचे परवाने निलंबित केले आहेत.

नवी मुंबई शहरात वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र त्याबरोबरच वाहतूक नियम तोडणाऱ्यांची संख्यादेखील वाढत चालली आहे. दिवसेंदिवस राज्यात वाहन अपघातांच्या संख्येत वाढ होत असून त्यातील बहुतांश अपघात हे दुचाकीस्वारांचे आहेत आणि यात हेल्मेट न घातल्याने मृत्यू पावणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. म्हणून सर्वोच्च न्यायालयाने हेल्मेट सक्तीचे आदेश दिले आहेत. मात्र या आदेशाकडे दुचाकीस्वार दुर्लक्ष करतात.

या आठवड्यापासून मुंबई, ठाणे, नवी मुंबईत विनाहेल्मेट प्रवास करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश असून त्यांचा परवानाही निलंबित केला जाणार आहे. नवी मुंबई आरटीओने आणखी तीव्र मोहीम सुरू केली असून याआधीच एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान एकूण तीन हजार 938 वाहनांची तपासणी करण्यात आली आहे. या दरम्यान दोन हजार 371 दुचाकी चालक विनाहेल्मेट प्रवास करताना आढळून आले आहेत. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून 11 लाख 45 हजार रुपये वसूल केले आहे. त्यापैकी एक हजार 76 जणांचा परवाना निलंबित केला आहे, अशी माहिती आरटीओने दिली आहे.

Exit mobile version