। डोंबिवली । प्रतिनिधी ।
सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर उभ्या असणार्या विविध प्रकारच्या वस्तू विक्री करणार्या विक्रेत्यांच्या हातगाड्या, बेशिस्तीने रस्त्यावर रिक्षा उभ्या करणारे रिक्षा चालक हे शहर वाहतुकीतील शिस्त बिघडवत असतात. त्यामुळे डोंबिवलीतील चारही पोलीस ठाणे हद्दीतील पोलिसांनी या बेशिस्तांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी कल्याण, डोंबिवलीत दिवसा, रात्री वाहतुकीला अडथळा करून रस्ते, पदपथांवर वस्तू विक्री व्यवसाय करणारे, रस्ते अडवून प्रवासी वाहतूक करणार्या रिक्षा चालकांवर फौजदारी कारवाईचे आदेश दिले आहेत. या आदेशाप्रमाणे रामनगर पोलीस ठाणे, विष्णुनगर पोलीस ठाणे, टिळकनगर आणि मानपाडा पोलीस ठाण्यातील गस्तीवरील पोलिसांनी दिवसा, रात्री कारवाई सुरू केली आहे. रस्ते, पदपथ अडवून हातगाडीवर व्यवसाय करणारे विक्रेते, डोंबिवली रेल्वे स्थानक परिसर, बस स्थानक भागात आणि शहराच्या विविध भागात रस्ते, गल्लीबोळ अडवून प्रवासी वाहतुकीसाठी रिक्षा रस्त्यात उभे करून प्रवासी वाहतूक करणार्या रिक्षा चालकांवर फौजदारी कारवाई करण्यात येत आहे.