। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
चिपळूणमध्ये काही दिवसांपूर्वी खैर तस्करी प्रकरणात दहशतवाद विरोधी पथकाने मोठी कारवाई केली होती. यातील दोन संशयित नाशिकमधील होते. त्या अनुषंगाने नाशिक वन विभागाच्या अधिकार्यांनी खैर तस्करी प्रकरणाचा छडा लावण्यासाठी मंगळवारी (दि.26) चिपळुणातील सावर्डे येथे धाड टाकली. या धाडीत मोठ्या प्रमाणात खैरसाठा तसेच खैराचा ज्यूस आणि कात जप्त करण्यात आला आहे. हे गोडावून नाशिक वन अधिकार्यांनी सील केले आहे. नाशिक येथून खैर तस्करी करून त्यापासून खैराचा ज्युस आणि कात तयार केल्याच्या संशयातून ही कारवाई करण्यात आली आहे.
नाशिकच्या हवेत येथे खैर तस्करी प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणी गुन्हाचे धागेदोरे चिपळूणपर्यंत आले आहेत. त्यामुळे नाशिक वन विभागाने थेट चिपळूणकडे मोर्चा वळविला असून, मंगळवारी दिवसभर ही धडक कारवाई करण्यात आली. नाशिक वन पथकाचे पंधरा अधिकारी व कर्मचारी चार बाहनांतून चिपळुणात आले व सिंडीकेट फूड्स, कुंभारवाडा सावर्डा येथे ही धाड टाकण्यात आली. यावेळी त्या ठिकाणी या उद्योगाचे संचालक उपस्थित नव्हते. त्यामुळे अधिकार्यानी तेथील कागदपत्रे, पुस्तके, वाहतूक पास आदी चौकशीकरिता जप्त केले. तसेच खैराचा ज्यूस, रेडीमेड कात निदर्शनास आल्यावर नाशिकमध्ये सौराची अवैध लाकूडतोड करून त्यापासून ते बनविण्याचा संशय अधिकार्यांना आला आणि त्यांनी हे गोडावून सील केले आहे. या प्रकरणी संबंधितांचा शोध घेण्यात येत आहे.