सुकापुर-आकुर्लीत अतिक्रमणांवर कारवाई

| पनवेल | प्रतिनिधी |

सुकापुर-आकुर्ली येथील रस्त्याच्या बाजूला असलेल्या अतिक्रमणांवर 4 ऑक्टोबर रोजी नैनाकडून कारवाई करण्यात आली तसेच काही प्रमाणात अतिक्रमणे तोडली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्याच्या बाजूला सुकापुर आकुर्ली परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे करण्यात आलेली आहेत. वडापाव, लादयांची दुकाने, हातगाड्या, बेड, सोफा, बेकायदेशीर घरे, पक्की बांधकामे स्टॉल उभारण्यात आले आहेत. या जागेचे हजारो रुपये भाडे घेतले जाते. या परिसरात नागरिकांची संख्या वाढत आहे. त्यातच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर विना परवाना अतिक्रमणे केली जात आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत या माथेरान रस्त्यावरील जागा 1965 ते 1970 च्या दरम्यान हस्तंतर केली असल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र अनेक ठिकाणी अतिक्रमण झालेली दिसत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने यावर कारवाई केली नाही. मात्र नैना प्रशासनाने आजवर कारवाई केली. या अतिक्रमणांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते.

पाली देवद ग्रामपंचायतने या अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी औद्योगिक विकास महामंडळ, सिडको, जिल्हाधिकारी, पंचायत समिती यांना पत्र दिले होते. रस्त्यापासून दहा फूट पर्यंत असलेल्या अतिक्रमणांवर ही कारवाई करण्यात येत असल्याची माहिती नैनाच्या अधिकाऱ्यांनी दिली. अतिक्रमणे काढण्यासाठी नैनाचे अधिकारी आले असल्याची माहिती मिळताच काहींनी आपले अतिक्रमणे स्वतःहून काढून घेतली. काही अतिक्रमणे नैनाच्या अतिक्रमण विभागाने तोडली.

Exit mobile version