। चिपळूण । प्रतिनिधी ।
तालुक्यातील मार्गताम्हाणे येथे हातभट्टीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धाड टाकून 1 लाख 38 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी प्रवीण बाळकृष्ण चव्हाण (रा.मार्गताम्हाणे, चिपळूण) याला अटक करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयुक्त कांतीलाल उमाप यांच्या निर्देशानुसार विभागीय उपआयुक्त वाय.एम. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक सागर धोमकर यांनी हातभट्टी निर्मूलन मोहीम सुरू केली आहे. त्यानुसार, उपअधीक्षक व्ही.व्ही. वैद्य यांच्या नेतृत्वाखाली भरारीपथक चिपळूण, खेड कार्यालयाने संयुक्तपणे धाड टाकली. यावेळी मार्गताम्हाणे येथील चव्हाणवाडी येथे हातभट्टी निर्मितीसाठी आवश्यक असे रसायन साठवून ठेवलेल्या 200 लीटर मापाच्या जवळपास 6 बॅरल मिळून आले, तसेच गावठी दारूची वाहतूक करताना एक ओमनी कार मिळाली. त्या ठिकाणी गावठी दारू व रसायन असा मिळून 1 लाख 38 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई दुय्यम निरीक्षक किरण पाटील, निखिल पाटील, महादेव आगळे, राजेंद्र भालेकर, जवान विशाल विचार, अतुल वसावे, सावळाराम वड यांनी केली.