चिपळूण महसूल विभागाचा बडगा
। चिपळूण । प्रतिनिधी ।
तालुक्यातील गोवळकोट धक्का कालुस्ते पुलाखाली अवैधरित्या संकलित केलेला अडीच लाख किंमतीचा सुमारे 35 ब्रास वाळूसाठा जप्त केला आहे. चिपळूण महसूल विभागाच्या भरारी पथकाने रात्रीच्या सुमारास ही धडक कारवाई केली असून, जप्त वाळूसाठी उक्ताड शासकीय गोदामात ठेवण्यात आला आहे.
प्रांत अधिकारी प्रविण पवार, तहसीलदार जयराज सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार तानाजी शेजाळ, मंडळ अधिकारी उमेश गिज्जेवार, तसेच गोवळकोट, मालदोली व कापसाळ येथील तलाठ्यांनी ही कारवाई केली.
अनेक महिन्यांपासून दाभोळ खाडीतील वाळू उत्खनन बंद असून, सद्यःस्थितीत वाळूचे गट देण्याची प्रक्रीया सुरू करण्यात आली आहे. यासाठी वाळू व्यवसायातील व्यावसायिक पुढे सरसावले आहेत. याशिवाय आस्थापनेकडे रॉयल्टी स्वरूपात काही रक्कम जमा करण्यात आली असून, या व्यवसायासाठी उत्तर प्रदेशहून कामगार देखील मागविण्यात आले आहेत.
या पार्श्वभूमीवर आगामी किंवा सुरु आठवड्यात वाळू व्यवसाय जोमाने सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. पण वाळू उत्खननाचा परवाना मिळण्याआधीच खाडीत उत्खनन केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. यातील अधोरेखित करण्यासारखी बाब म्हणजे गोवळकोट परिसरातील वाशिष्ठी नदीकिनार्यांवर शासकीय जागेत हा वाळूसाठा आढळून आला.
याबाबतची माहिती मिळताच महसूल विभागाच्या भरारी पथकाने कारवाईचा बडगा उगारला. अर्थातच या गुन्ह्यामागील नेमका सुत्रधार कोण असल्याची माहीती न मिळाल्याने याप्रकरणी अद्याप दंडात्मक कारवाई करण्यात आलेली नाही. मात्र लवकरच या वाळूचा लिलाव महसूल विभागाकडून केला जाणार आहे.