आजी-माजी नगरसेवक पोलिसांच्या ताब्यात
महिला दलालाविरुद्ध गुन्हा दाखल
| उलवे | प्रतिनिधी |
उलवे परिसरातील एका लॉजवर पोलिसांनी धडक कारवाई करत कथित अनैतिक व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी एका महिला दलालाविरुद्ध विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपासाचे धागेदोरे थेट पेण शहरापर्यंत पोहोचल्याने प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. पीडित अल्पवयीन मुलीच्या जबाबानंतर पेणमधील माजी नगरसेवक कुणाल नाईक तसेच विद्यमान नगरसेवक उपेंद्र कोलाडकर, अच्युत पाटील आणि प्रमोद पाटील यांना उलवे पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत उलवे पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार अजिंक्य सुभाष गोसावी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर क्रमांक 119/2026 दाखल करण्यात आला आहे. आरोपी सारिका (वय 33, रा. सीबीडी बेलापूर) हिच्याविरोधात भारतीय न्याय संहिता 2023, अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा, पॉक्सो कायदा तसेच बाल न्याय अधिनियमांतर्गत गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 जून रोजी सायंकाळी उलवे सेक्टर-19 येथील ‘ला रेसिडेन्सी लॉज’च्या रूम क्रमांक 202 मध्ये ही कारवाई करण्यात आली. प्राथमिक तपासात आरोपी महिलेने दोन अल्पवयीन मुली अल्पवयीन असल्याची माहिती असूनही त्यांना ग्राहकांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी प्रवृत्त केल्याचे समोर आले आहे. तसेच या माध्यमातून आर्थिक लाभ मिळवून स्वतःचा उदरनिर्वाह केल्याचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला आहे.
कारवाईदरम्यान पोलिसांनी 36,100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, त्यामध्ये रोकड क्कम, बनावट चलनी नोटा तसेच विविध कंपन्यांचे मोबाईल फोन यांचा समावेश आहे. दरम्यान, पीडित अल्पवयीन मुलींकडून माहिती घेत असताना एका 13 वर्षीय मुलीने दिलेल्या जबाबात तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवण्यात आल्याचा आरोप केला आहे. या जबाबामध्ये कुणाल नाईक, उपेंद्र कोलाडकर, अच्युत पाटील आणि प्रमोद पाटील यांची नावे समोर आल्याचे पोलिस सूत्रांकडून समजते. त्यानंतर उलवे पोलिसांनी संबंधितांना पेण पोलीस ठाण्यातून ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे. या आरोपांची सत्यता तपासातून स्पष्ट होणार आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त अमित काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर गायकवाड आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन राजणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा पाटील करीत असून, प्रकरणातील इतर बाबींचाही सखोल तपास सुरू आहे.
