पाबळमध्ये बोगस डॉक्टरवर धडक

आरोग्य विभागाचा कायदेशीर बडगा

| पेण | प्रतिनिधी |

पेण तालुक्यातील अतिदुर्गम पाबळ खोऱ्यात अनधिकृत वैद्यकीय व्यवसायाच्या आरोपावरून आरोग्य विभागाने एकनाथ राघो मोकल यांच्याविरुद्ध पुन्हा धडक कारवाई केली आहे. विशेष म्हणजे, संबंधित व्यक्तीविरुद्ध यापूर्वी 2014 तसेच 2023 मध्येही कथित बोगस डॉक्टर म्हणून कारवाई झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. त्यानंतरही वैद्यकीय व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्याने शुक्रवारी (दि.18) पुन्हा कारवाई करण्यात आली.

पेण तालुक्यातील पाबळ येथील एकनाथ मोकल यांच्याविरूद्ध अनधिकृत वैद्यकीय व्यवसायाबाबत आरोप होत होते. दरम्यान, संबंधित व्यक्ती वैद्यकीय व्यवसाय करत असल्याची माहिती गडब प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळाली. त्यानंतर आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन अविनाश म्हात्रे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी कारवाई करण्यात आली. या कारवाईत अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी संदीप नरवणे, आरोग्य परिवेक्षक समीर सानप आणि 102 रुग्णवाहिका चालक सागर पाटील सहभागी झाले होते. या प्रकरणातील महत्त्वाची बाब म्हणजे संबंधित व्यक्तीविरुद्ध 2014 आणि 2023 मध्येही अशाच स्वरूपाच्या आरोपावरून कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर पुन्हा वैद्यकीय व्यवसाय करत असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली. त्यामुळे पूर्वीच्या कारवाईनंतरही हा प्रकार पुन्हा कसा सुरू झाला? याचीही सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचे या घटनेतून अधोरेखित होत आहे. तसेच, दुर्गम भागात अनधिकृत वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींमुळे नागरिकांच्या आरोग्यावर संभाव्य परिणाम होऊ शकतो. त्यामुळे केवळ एखाद्या व्यक्तीवर कारवाई करून थांबण्याऐवजी अशा प्रकारच्या वैद्यकीय व्यवसायाची साखळी, औषधांचा पुरवठा आणि संबंधित व्यक्तीची प्रत्यक्ष वैद्यकीय पात्रता यांचीही तपासणी होणे महत्त्वाचे ठरणार आहे. या कारवाईमध्ये एफडीए अधिकारी संदीप नरवणे यांनी विशेष भूमिका बजावल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, आरोग्य विभागाच्या या कारवाईमुळे पाबळ खोऱ्यात खळबळ उडाली आहे. दोन वेळा कारवाई झाल्यानंतरही पुन्हा त्याच स्वरूपाचा आरोप समोर येत असल्याने, आता या प्रकरणाच्या पुढील तपासातून नेमके काय समोर येते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणी वडखळ पोलीस ठाण्यात एकनाथ मोकल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

औषधसाठा जप्त
कारवाईदरम्यान आढळून आलेला औषधसाठा अन्न व औषध प्रशासनाने नियमानुसार जप्त केला आहे. या औषधसाठ्याची पुढील तपासणी व आवश्यक कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कारवाईदरम्यान आवश्यक कागदपत्रे व इतर पुरावे संकलित करण्यात आले असून, पंचनामा करून पुढील कार्यवाही करण्यात आली.
Exit mobile version