कोट्यवधींचे ड्रग्ज जप्त
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील किकवी सराईवाडी या ठिकाणी असलेल्या सावली फार्म हाऊसमध्ये मेफेड्रॉन (एमडी) या अमली पदार्थाच्या पावडर निर्मितीचा कारखाना मुंबईच्या आरसीएफ पोलीस ठाणे विभागाच्या पथकाने उद्ध्वस्त केला. याबाबतची कारवाई मंगळवारी, दि. 27 मे रोजी मध्यरात्री करण्यात आली. यामध्ये सहजणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून एमडी पावडरसह 24 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शेळीपालनाच्या आडून एमडीचा बाजार मांडल्याचे या कारवाईवरुन उघड झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबईतील आर.सी.एफ. पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई करुन सहाजणांना अटक केली आहे. मुंबईवरुन पोलीस पथक येऊन कारवाई करते, परंतु स्थानिक कर्जत पोलिसांना याबाबत काहीही माहिती नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. कर्जत पोलिसांची ही भूमिका संशयास्पद वाटत आहे.
मुंबई पोलिसांनी कर्जत तालुक्यातील किकवी सराईवाडी येथील सावली फार्म हाऊसवर केलेल्या कारवाईत एमडी ड्रग्ज बनविणारा कारखाना उद्ध्वस्त केला आहे. या ठिकाणी शेळीपालन व्यवसाय करीत असल्याचे भासवून त्यामागे अमली पदार्थ निर्मिती करण्याचा कारखाना सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत कारखान्यात उत्पादन करणाऱ्या टोळीपैकी एका इसमास अटक करून तो साथीदारांच्या मदतीने चालवित असलेल्या कारखान्यामधून 11 कोटी रू. किमतीचा एकूण 5 किलो 525 ग्रॅम एम.डी. (मेफेड्रॉन) व अंदाजे एक कोटी रुपयांच्या अमली पदार्थाची निर्मितीकरिता लागणारा कच्चा माल व इलेक्ट्रॉनिक प्लॅन्टचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.
या गुन्ह्यात अद्यापपर्यंत 24 कोटी रुपयांचा एकूण 12 किलो 664 ग्रॅम वजनाचा एमडी (मेफेड्रॉन) व अंदाजे एक कोटी किमतीचा अंमली पदार्थाची निर्मितीकरिता लागणारा कच्चा माल व इलेक्ट्रॉनिक प्लॅन्टचे साहित्य हस्तगत करण्यात आले असून, अमली पदार्थाची विक्री करणारे पाच आरोपी व उत्पादन करणारा टोळीमधील एक अशा एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आले आहे.
कर्जत पोलीस संशयाच्या भोवऱ्यात
कर्जत तालुक्यात ड्रग्ज बनविणारा कारखाना सुरू असताना स्थानिक पोलिसांना याची माहिती नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. मुंबईहून पोलिसांचे पथक रात्रीच्या सुमारास कारवाई करते, याची कर्जत पोलिसांना माहिती नसणे, दुर्दैव म्हणावे लागेल. नव्याने रुजू झालेल्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी या गंभीर घटनेकडे लक्ष देण्याची गरज आहे.