| उरण | वार्ताहर |
उरण तालुक्यातील बोरी पाखाडी हुसेन मंजिल येथे राहणारे इकबाल कुट्टी यांनी कुटूंबासह दि. 21 मे रोजी रात्री उरण ते कन्नूर केरळ प्रवास सुरु केला. त्यांनी रत्नागिरी- गोवा मंगलोर असे फिरता प्रवास सुरु केला होता. शुक्रवारी दि. 23 रोजी मारुती एर्टिगा या कारने प्रवास करत असताना कासरगोड चरकाला या ठिकाणी सकाळी 5:30 वाजता कार मधून अचानक धूर येऊ लागला.
रुबीना इकबाल कुट्टी या कार चालवत होत्या. अचानक कारमधून धूर येऊ लागल्याने रुबीना कुट्टी यांनी कार बाजूला पार्किंग केली. कारमधून सर्वजण बाहेर पडले. सुरक्षित ठिकाणी एका बाजूला सर्वजण उभे राहिले. यामुळे सर्वांचे प्राण वाचले. या घटनेत कारला आग लागून कारचे मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. या कारमध्ये इकबाल कुट्टी, रुबीना कुट्टी, नोफ कुट्टी, अजीझा कुट्टी, उमर कुट्टी हे प्रवास करीत होते. या घटने बाबत इकबाल कुट्टी व त्यांच्या परिवाराने कासारगोडे जिल्ह्यातील विद्यानगर येथील पोलीस ठाण्यात माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने गुन्हा नोंदवून घेतला आहे. या वाहनाला आग लागल्याची घटना कशामुळे घडली? आग कशी लागली याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.