कळंबोलीत अमली पदार्थाची विक्री करणाऱ्यांवर कारवाई

। पनवेल । वार्ताहर ।

कळंबोली येथील स्टील मार्केट परिसरात अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना कळंबोली पोलिसांनी सापळा रचून अटक केली. राजेश शर्मा (26) आणि योगेश पवार (25) अशी या दोघांची नावे असून, या दोघांच्या ताब्यातून 5 किलो 82 ग्रॅम वजनाचा 2 लाख 54 हजार रुपये किमतीचा गांजा साठा जप्त केला आहे. या प्रकरणात सहभागी असलेल्या त्यांच्या तिसऱ्या साथीदाराचा शोध पोलीस घेत आहेत.

कळंबोलीतील स्टील मार्केट परिसरामध्ये दोन व्यक्ती अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती कळंबोली पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वपोनि. राजेंद्र कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. आयाज पटेल, सपोनि. नितीन शिंदे, पीएसआय. अमोल चौगुले व त्यांच्या पथकाने कळंबोली स्टील मार्केट परिसरात सापळा लावला होता. या वेळी राजेश शर्मा व योगेश पवार हे दोघे त्या भागात संशयास्पदरीत्या आले असता, दबा धरून बसलेल्या पोलिसांनी दोघांची धरपकड केली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडे असलेल्या बॅगेची झडती घेतली असता, त्यात 5 किलो 82 ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. पोलिसांनी हा गांजा जप्त करून दोघांची चौकशी केली असता, कळंबोली गावात राहणाऱ्या एका व्यक्तीने खरेदीसाठी हा गांजा मागवल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार कळंबोली पोलिसांनी या तिघांविरोधात गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे.

Exit mobile version