कार्यकर्त्यांनी खचू नये: स्नेहल जगताप

| महाड | प्रतिनिधी |

महाड विधानसभा मतदारसंघात झालेल्या पराभवाने कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये, असे भावनिक आवाहन ठाकरे गटाच्या उमेदवार स्नेहल जगताप यांनी केले आहे. स्नेहल जगताप यांनी निवडणुकीच्या निकालानंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधला. निवडणुकीतील झालेल्या पराभवाने कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये व आजपासूनच पुन्हा जोमाने कामाला लागून, पुन्हा मैदानात उतरुया, असे आवाहनही त्यांनी केले.

मतदारसंघातील जनतेसाठी मी पूर्वीप्रमाणेच ताकदीने उभी राहून त्यांच्या न्याय्य हक्कासाठी आणि विशेष करुन तरुणांच्या रोजगारासाठी हा माझा लढा सुरूच राहील. प्रत्येक क्षेत्रात यश-अपयश येतच असते आणि अपयश ही यशाची पहिली पहिली पायरी समजली जाते. त्यामुळे कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये, असे आवाहन केले.

विधानसभेच्या निवडणुकीत स्नेहल जगताप यांचा झालेला पराभव हा कार्यकर्त्यांना धक्कादायक ठरल्याचे महाडमध्ये सर्वत्र दिसून येत होते. सायंकाळी उशिरा शेकडो समर्थकांनी कॅप्टन निवास येथे जाऊन नानासाहेब जगताप व स्नेहल जगताप यांची भेट घेतली. याप्रसंगी महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित कार्यकर्त्यांना व सहकारी पदाधिकार्‍यांसमोर स्नेहल जगताप यांनी या निवडणुकीदरम्यान दोन महिन्यांपासून महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी घेतलेल्या अथक प्रयत्नाबद्दल त्यांना धन्यवाद दिले. आपली लढाई ही सोपी नव्हती हे माहीत असूनही महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी या लढाईमध्ये तन, मन, धन हरपून सर्वस्व दिल्या कारणानेच आपण 91 हजार मतांपर्यंत पोहोचू शकलो असे स्पष्ट केले. पराभवाची कारणमीमांसा करून पुढील विजयासाठी सर्वांनी सिद्ध होण्याचे आवाहन केले. तसेच संपूर्ण मतदारसंघाच्या आभार दौर्‍याचे आयोजन करुन मतदाराराजाने दिलेल्या बहुमोल सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानणार असल्याचे स्नेहल जगताप यांनी सांगितले.

Exit mobile version