नेरळची तहकूब ग्रामसभा ‌‘हाऊसफुल्ल’

पाणी, अतिक्रमण, स्मार्ट मीटरसह विविध प्रश्नांवर चर्चा

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतींपैकी एक असलेल्या नेरळ ग्रामपंचायतीची तहकूब ग्रामसभा ग्रामस्थांच्या विक्रमी उपस्थितीत आणि कडेकोट पोलीस बंदोबस्तात पार पडली. महिलांचा मोठा सहभाग लाभलेल्या या ग्रामसभेत पाणीटंचाई, अतिक्रमण, शासकीय जागांचे संरक्षण, स्मार्ट मीटर, वाहतूक कोंडी आदी विविध प्रश्नांवर जोरदार चर्चा झाली. बहुसंख्येने महिलांचा मोठा सहभाग असलेली नेरळच्या इतिहासातील ही पहिलीच ग्रामसभा ठरली आहे. दरम्यान, अनेक विषय मार्गी लावणारी आणि अनेक विषयांमध्ये ग्रामस्थांचे समाधान न झालेली अशी ही ग्रामसभा ठरली आहे.

नेरळ ग्रामपंचायतीची तहकूब ग्रामसभा प्रशासक सुजित धनगर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी रायगड जिल्हा परिषदेच्या सदस्य सुनीता मोरे, कर्जत पंचायत समितीचे सदस्य भगवान चंचे, कविता शिंगवा आणि ग्रामपंचायत अधिकारी अरुण कार्ले आदी उपस्थित होते. या तहकूब ग्रामसभा असूनदेखील या ग्रामसभेला पहिल्यांदाच सर्वाधिक गर्दी होती. ग्रासमभेच्या सुरुवातीपासून गोंगाट आणि आपले प्रश्न झाले पाहिजेत यासाठी धावपळ सुरु होती. त्यात कर्जत पंचायत समितीच्या माजी सदस्य सुमित्रा सुगवेकर यांनी या गोंगाटात सभागृह सोडले आणि आपली प्रतिक्रिया दिली. त्यात सुनील पारधी हे आदिवासी समाजासाठी हक्काचा निधी मिळाला नाही म्हणून प्रश्नांनाची सरबत्ती केली. लव्हल वाडी आणि टपाल वाडी येथील महिलांनी पिण्याचे पाणी मिळत नाही म्हणून प्रश्न उपस्थित केले, तर आठ दिवसात जलवाहिनी टाकून पाणी दिले जाईल, असे आश्वासन देण्यात आले.सुनील पारधी यांनी लव्हाळवाडीतील धनगरांना घरकुल वस्तीला पाणी देण्यात आले तसेच सर्व वाड्यांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना घरपोच पाणी देण्यात यावे.

साईकृपा व्हॅलीमधील रहिवासी मृणालिनी शेळके, ब्रिजिटा डीकोस्टा, श्रद्धा चव्हाण, अश्विनी जोशी, सुनीता बनसोडे, नरेश शेंडे तसेच अनेक रहिवाशांनी तेथील पाण्याचा प्रश्न उपस्थित केला. रहिवाशांनी महिलांनी गर्दी करीत पाणी मिळत नसल्याने पाणी नाहीतर टॅक्स नाही, अशी भूमिका घेतली. शेवटी आठ दिवसात दोन इंचाची जलवाहिनी टाकून देण्याचा निर्णय झाला.

नेरळ धरणाजवळील अतिक्रमण तात्काळ काढावे अशी मागणी तरुणांनी केली, तर ग्रामसेवक आणि प्रशासक यांना ॲट्रॉसिटी गुन्ह्याची धमकी देणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई करावी असा ठराव एकमताने घेण्यात आला. प्रथमेश मोरे यांनी नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील सर्व फूटपाथ मोकळे करून अतिक्रमण मुक्त फुटपाथ करण्याची मागणी केली. पाटील गुरुजी यांनी नेरळ परिसरात खूप समस्या आहेत. फुटपाथ, गाड्यांची ट्रॅफिक, कचरा, तसेच फुटपाथवर बरीच भाजी विक्रेती आहेत, तर ते खाली करण्यात यावे अशीदेखील मागणी करण्यात आली. सनी चंचे यांनी आपल्या ग्रामपंचायतीचे जे शासकीय जागा आहेत, त्या सर्व जागा ताब्यात घेऊन मोजणी करण्याचे मागणी केली. घरपट्टी पाणीपट्टी ही ऑनलाईन भरता यावी अशी सुधारणा तात्काळ करावी, असा ठराव भगवान चंचे यांनी मांडला. नेरळ ग्रामपंचायत हद्दीत हिंदू समाज मंदिरासाठी 15 गुंठे जमीन देण्याची मागणी केली असता त्याचा ठराव संमत करण्यात आला.

नायजेरियन लोकांची वस्ती आपल्या वॉर्डात आहेत, तरी सदरच्या लोकांची चौकशी करून घेण्यात यावी अशी मागणी प्रफुल्ल यांनी केली. तर बाजारपेठेमध्ये जे व्यापार करतात ते कुठून येतात, ते बांग्लादेशी आहेत की कुठले आहे त्यांच्या माहिती घेण्यात यावी अशी मागणी शाम कडव यांनी केली. शाम कडव यांनी कल्याण कर्जत रस्त्यालगत रस्त्या शेजारील (हायवे) शेजारीला कचरा कुंडी कोणी तोडली असून, त्यामुळे पाण्याचा आऊटलेट बंद केला आहे, त्याच्यावर कारवाई करण्यात यावी आणि तेथे बांधलेले गाळे यांना परवानगी नाही आणि पोलीस बंदोबस्त घेऊन कारवाई करण्यात यावी असा निर्णय घेण्यात आला. बंडू क्षीरसागर यांनी स्मार्ट मीटर लावण्यात येऊ नये असा ठराव मांडला आणि तो ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. ग्रामसभेत संजय मनवे, सावळाराम जाधव, परेश सुर्वे, सनी चंचे, भगवान चव्हाण, सूर्यकांत चंचे, प्रथमेश मोरे, बंडू क्षीरसागर, विशाल साळुंखे, पाटील गुरुजी, शाम कडव, उमेश भागीत, गोरख शेप, रोहिदास मोरे यांनी प्रश्न उपस्थित केले.

Exit mobile version