। माथेरान । वार्ताहर ।
माथेरानमध्ये दररोज सुरू असलेल्या विजेच्या लपंडावामुळे येथील नागरिक व्यापारी वर्ग हैराण झाले आहेत. वीज पुरवठा सारखा खंडित होत आहे. विद्युतदाब कमी जास्त होत आहे. या विजेच्या समस्या लवकरात लवकर पुढील दहा दिवसांच्या आत पूर्णतः सोडवाव्यात अन्यथा माथेरान येथील महावितरण कार्यालय येथे ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा सज्जड इशारा माथेरान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कर्जत येथील महावितरणचे उपअभियंता प्रकाश देवके यांना प्रत्यक्ष भेटून चर्चा करून निवेदन देण्यात आले आहे.
अजूनही जुलै महिन्यातील मुसळधार पाऊस पडायचा बाकी आहे. परंतु आत्ता पासूनच विजेचा खेळखंडोबा सुरू झाला आहे. आणि विजेचा विद्युतदाब सारखा सारखा कमी जास्त होत आहे. यामुळे घरगुती आणि व्यावसायिक हॉटेल मधील विद्युत उपकरणे ही खराब होत आहेत. आणि त्याच बरोबर शनिवार व रविवार येथे येणार्या पर्यटकांना देखील याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने एटीएम मशीन सुद्धा बंद पडते व्यवस्थित चालत नाहीत. त्यामुळे पर्यटकांना कॅश लेस, ऑनलाईन व्यवहार करण्याची सुविधा मिळत नाही. यामुळे नागरिकांचे व येथील हॉटेल व्यावसायिक यांचे मोठे नुकसान होत आहे. शहरात सुरू असलेल्या या विजेच्या लपंडावामुळे माथेरान मधील नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत. यासंबंधी माथेरान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मंगवारी दि.21 रोजी कर्जत येथील महावितरण कार्यालयात जाऊन तेथील उपअभियंता प्रकाश देवके यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात असे नमूद केले आहे की पुढील दहा दिवसांत माथेरान शहरातील वीज पुरवठा सुरळीत करावा अन्यथा अकराव्या दिवशी माथेरान येथील महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल. हे निवेदन देते वेळी संतोष कदम, रविंद्र कदम, असिफ खान आदी मनसैनिक उपस्थित होते.