दिबांच्या जयंतीला विमानाचे उड्डाण करावे: विजय शिरढोणकर
| पनवेल | प्रतिनिधी |
नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टर्मिनलचे उदघाटन बुधवारी (दि.8) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते पार पडणार आहे. मात्र, विमानतळाच्या कामांमध्ये अद्यापही परिपूर्णता नाही. त्यामुळे विमानतळाचे काम अपूर्ण असतानाही विमानतळाच्या उदघाटनाची घाई का करण्यात आली, असा सवाल उद्योजक विजय शिरढोणकर यांनी केला आहे. तसेच, दिबांच्या शंभराव्या जयंतीला प्रत्यक्ष विमानाचे पहिले उड्डान करावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
यावेळी बोलताना विजय शिरढोणकर सांगितले की, आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उदघाटन करताना आपले इन्फ्रास्ट्रक्चर पूर्ण नाही, याचेही भान अदानी कंपनीने ठेवायला हवे. विमानतळाच्या प्रवेशद्वारावर असलेल्या पोलीस ठाण्याच्या इमारतीला बाहेरून चुना फासण्याचे काम ही कंपनी करत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डोळ्यात धूळ फेकत आहे. विमानतळ उदघाटन इतक्या घाईघाईने सुरु आहे, परंतु विमानतळासाठी कोणत्याही सुविधा अद्याप पुर्णत्वास आलेल्या नाहीत. ज्या पद्धतीने मेट्रो सेवा, कोस्टल रोड आदी सुविधांची गरज या विमानतळाला आहे, त्या पूर्ण करण्यामध्ये प्रशासन मागे पडले आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय विमानाचे उड्डाण हे डिसेंबरमध्ये सुरु होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे याठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे येणारे नागरिक उलव्याच्या ढाब्यावर जेवायला जाणार का? असा सवाल देखील विजय शिरढोणकर यांनी केला आहे. तसेच, उदघाटनाच्या दिवशी स्व. लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव या आंतरराष्ट्रीय विमानतळाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर करावे आणि प्रत्यक्ष विमानाचे उड्डाण हे दिबांच्या 100 व्या जयंतीनिमित्त 13 जानेवारी रोजी करून त्यांच्या स्मृतीला देशाच्यावतीने अभिवादन करण्याची मागणी देखील त्यांनी बोलताना केली आहे.





