| माथेरान | प्रतिनिधी |
माथेरानमधील अंबालाल वाघेला हे रविवारी (दि.5) सकाळच्या दरम्यान पर्यटकांना अमानवीय हातरिक्षा ओढताना त्यांची प्रकृती गंभीररित्या बिघडली. त्यांना तात्काळ नगरपरिषदेच्या बी.जे. हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉ. प्रशांत यादव यांनी योग्यरित्या उपचार केल्याने अंबालाल यांची प्रकृती स्थिर होऊ शकली. अंबालाल यांची लक्षणे पाहता हृदयविकाराचा झटका आल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. त्यांना पुढील उपचारासाठी पनवेल येथील एम.जी.एम हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले आहे. त्यामुळे या अमानवी प्रथेमुळे आणखी किती चालकांचे जीव धोक्यात टाकायचे, असा संतप्त सवाल हातरिक्षा चालकांकडून विचारला जात आहे.
माथेरानमध्ये एकूण 94 हातरीक्षांपैकी केवळ 20 ई-रिक्षा कार्यरत आहेत. उर्वरित 74 ई-रिक्षांना ताबडतोब मंजुरी दिल्यास हातरिक्षाची अमानवीय प्रथा कायमस्वरूपी संपुष्टात येऊ शकते. याबाबत सरन्यायाधीश भुषण गवई यांनी तीस पानी अंतिम आदेशात स्पष्ट केले आहे की, हातरीक्षा ओढल्याने चालकांच्या शरीरावर कश्याप्रकारे घातक परिणाम होतात. हृदयविकार, दमा या सारख्या आजाराला चालक बळी पडतात. त्यामुळे ही एक अमानवीय प्रथा असल्यामुळे या सर्वच हातरीक्षा 6 महिन्यांत बंद करून ई-रिक्षाद्वारे चालकांचे पुनर्वसन करण्यास सांगितले आहे. मागील डिसेंबर महिन्यात काळुराम पिरकट या रिक्षा चालकाचा हातरिक्षा ओढताना हृदय विकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाला होता. सुप्रीम कोर्टाचे आदेश येऊन दोन महिने झाले तरीसुद्धा या विषयावर सनियंत्रण समितीची बैठक झालेली नाही, हे सर्व संतापजनक आहे.
डॉक्टरांनी अंबालाल यांना कोणतेही श्रमाचे काम करण्यास मनाई केली आहे. परंतु, हातरिक्षा हेच अंबालाल यांच्या उत्पन्नाचे एकमेव साधन असल्याने त्यांच्या कुटुंबासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. अंबालाल यांनी स्वतः ई-रिक्षा खरेदी केलेली असल्याने त्यांना ती चालविण्यास तात्काळ परवानगी द्यावी, अशी मागणी अंबालाल यांच्या पत्नी गीता वाघेला यांनी केली आहे.





