आज रात्री 10 वाजता निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावतील
| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरूड जंजिरा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजता होणार आहे. प्रभाग 10 मधून 20 नगरसेवकांसाठी 58 तर थेट नगराध्यक्षासाठी 3 उमेदवार रिंगणात असून, या निवडणुकीकरिता एकूण 11,544 मतदार असणार यामध्ये पुरुष 5440, स्त्री 6104 मतदान करणार आहेत. मुरूड प्रशासनाकडून मतदानाची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. मतदानासाठी नियुक्त केलेले अधिकारी व कर्मचारी 17 ईव्हीएम व मतदान साहित्यासह मतदान केंद्रांकडे रवाना झाल्या आहेत.
नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने गेल्या पंधरवड्यापासून तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. सोमवारी रात्री दहा वाजता जाहीर प्रचार संपुष्टात येणार आहे. नगरपरिषद शिक्षण मंडळाच्या मराठी शाळेतील 17 मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात येणार आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी प्रशासनाने अधिकारी, कर्मचाऱ्यांची व पोलीस असे एकूण 154 यांची नियुक्ती केली आहे. प्रत्येक केंद्रावर पाच कर्मचारी, एक पोलीस व एक होमगार्ड नियुक्त करण्यात आला आहे. तसेच मतदान केंद्राच्या बाहेरदेखील पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यामध्ये मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी 1, 2 व 3 तसेच शिपाई असेल. पथकासोबत एक पोलीस कर्मचारीही असेल. शहरातील मतदान प्रक्रिया शांततेत व निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी नगरपरिषद, महसूल यंत्रणा व पोलीस विभाग सतर्क आहे. प्रशासनाने मतदान दृष्टीने तयारी पूर्ण केली आहे. पोलीस प्रशासनाकडून 60 पोलीस, 34 होमगार्ड व 8 अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी दिली.
