कृषीवलच्या दणक्याने प्रशासनाला जाग मिळकखारमधील बांधकाम बंद

तहसीलदारांनी काम बंद करण्याचे दिले आदेश

। अलिबाग । प्रतिनिधी ।

मिळकतखार येथे राजरोसपणे ठेकेदारामार्फत अनधिकृतपणे भराव सुर होता. ग्रामस्थांनी या विरोधात लढा दिला. तरी देखील प्रशासनाकडून दखल घेण्यात आली नाही. अखेर कृषीवलने वारंवार या प्रश्‍नांबाबत बातमीच्या रुपात आवाज उठवला. बातमीची दखल घेत प्रशासनाने भरावाचे काम थांबविले. अलिबागचे तहसिलदार विक्रम पाटील यांनी काम बंद करण्याचे आदेश दिल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

अलिबाग तालुक्यात सध्या माती माफियांनी धुमाकूळ घातला आहे. वेगवेगळ्या भागात खुलेआमपणे भराव करण्याबरोबरच खोदकाम केले जात आहे. शासनाचे नियम धाब्यावर बसवत माती माफिया हा धंदा राजरोसपणे चालवित आहे. धनदांडग्यांना पाठीशी घालण्याचे काम येथील स्थानिक पुढारीही करीत असल्याचे चित्र आहे. अलिबाग तालुक्यातील मिळकतखार येथे अनधिकृत भरावाचे काम गेल्या दहा दिवसांपासून सुरु होते. या भरावामुळे गावांना पुराचा धोका निर्माण होण्याची भिती निर्माण केली. या भरावामुळे पावसाळ्यात गावे, पुराने वाहून जाण्याची चिंता ग्रामस्थांनी व्यक्त केली. तरीदेखील धनदांडग्यांना अभय देण्याचे काम स्थानिक ठेकेदारानी सुरुच ठेवले.या अनधिकृत भरावाविरोधात मिळकतखार येथील विनय कडवेसह अन्य ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनासह तालुका प्रशासनाकडे निवेदन देऊन भरावाचे काम थांबविण्यात यावे अशी मागणी केली. परंतु ठोस कारवाई झाली नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचे सुर उमटले होते. अखेर कृषीवलने ग्रामस्थांच्या बाजूने उभे राहून धनदांडग्यांसह ठेकेदारांविरोधात आवाज उठविला. मिळकतखार येथील माती भराव प्रकरणाची दखल प्रशासनाने घेतली. कालपासून ते काम बंद करण्यात आले आहे. तहसीदारांच्या आदेशाने काम बंद झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

ग्रामस्थांनी मानले कृषीवलचे आभार
अलिबाग तालुक्यातील मिळकतखार येथे गेल्या अनेक दिवसांपासून बेकायदेशीररित्या भराव सुरू होता. याविरोधात ग्रामस्थांनी अनेकवेळा लढा दिला. भरावामुळे गावांना पुराचा धोका निर्माण होण्याची भिती निर्माण झाली होती. अंधाराचा फायदा घेत माफियांनी भराव करण्याचा प्रयत्न केला. स्थानिक विनय कडवे यांनी डंपरला आडवे जाऊन मनमानी कारभार रोखण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्थांच्या या समस्येबाबत दैनिक कृषीवलने अनेकवेळा आवाज उठविला. भराव करणार्‍या ठेकेदारांविरोधात बातमीच्या रुपात आवाज उठविल्याने प्रशासनही खडबडून जागे झाले. अलिबागचे तहसीलदार विक्रम पाटील यांनी भरावाचे काम बंद करण्याचे आदेश दिले आहेत. कालपासून कामबंद झाल्याने ग्रामस्थांनी कृषीवलचे आभार व्यक्त केले.
Exit mobile version