क्रीडा संकुलात प्रशासनाचा ‘खेळ’

निवडणूक विभागाकडून वापर, लाखो रुपयांचे भाडे थकीत

। अलिबाग । प्रमोद जाधव ।

लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीत मतमोजणी व स्ट्राँग रुम म्हणून जिल्हा क्रीडा संकुलाचा वापर करण्यात आला. मतमोजणी होऊन अनेक दिवस उलटून गेले; परंतु आजही या संकुलाच्या परिसरात जेवणाची पाकिटे, पाण्याच्या बाटल्या, खोके, फलक आदी अस्ताव्यस्त पडून आहेत. ‘गरज सरो आणि वैद्य मरो’ अशी अवस्था या संकुलाची झाली आहे. त्यामुळे हे संकुल उपेक्षित असल्याचे चित्र दिसून येत आहे. निवडणूक विभागाच्या या भूमिकेबाबत क्रीडाप्रेमींकडून नाराजीचे सूर उमटत आहेत.

अलिबाग हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी क्रीडा संकुल उभारण्याच्या हालचाली गेल्या पंधरा वर्षांपूर्वी सुरु झाल्या. अलिबाग तालुक्यातील नेहुली येथे हे संकुल उभारण्यात आले. दोन टप्प्यात संकुलाचे काम करण्यात आले. पहिल्या टप्प्यात हॉस्टेल, सभागृह तसेच दुसर्‍या टप्प्यात स्वीमिंग पूल, कार्यालय, ट्रॅक बांधण्यात आले. त्यासाठी सुमारे आठ कोटी रुपयांचा निधी खर्च झाला. क्रीडा संकुलामुळे खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळाले. या संकुलाच्या माध्यमातून धावणे, पोहणे, क्रिकेट आदी खेळाडूंना संधी मिळू लागली. पोलीस भरतीच्या पार्श्‍वभूमीवरदेखील अनेक खेळाडू सराव करण्यासाठी येतात. परंतु, 2019 पासून जिल्हा क्रीडा संकुलाचा वापर निवडणूक व 2020 मध्ये कोरोनाच्या काळात कोव्हीड सेंटर म्हणून करण्यात आला. त्यानंतर 2024 पर्यंत झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मतमोजणीसाठी वापर करण्यात आला. नुकतीच विधानसभा मतमोजणी पार पडली. या निवडणुकीच्या निमित्ताने संकुलामध्ये वेगवेगळे फलक लावण्यात आले होते. परंतु, मतमोजणी झाल्यावर क्रीडा संकुल उपेक्षित झाल्याचे चित्र पहावयास मिळाले आहे. क्रीडा संकुलामध्ये सरावासाठी येणार्‍या खेळाडूंची प्रचंड गैरसोय होत आहे. या परिसरात पाण्याच्या बाटल्या, खाद्य पदार्थांचे खोके, फलक अस्ताव्यस्त टाकून दिले आहेत. त्यामुळे क्रीडा संकुलाचा परिसर विद्रुप दिसत असून, खेळाडूंकडून प्रशासनाच्या नावाने प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

डिसेंबरमध्ये क्रीडा संकुलामध्ये वेगवेगळे खेळ भरविले जातात. त्यामध्ये क्रिकेट हा खेळ मोठ्या प्रमाणात खेळला जातो. क्रीडा संकुलाच्या या विद्रुपीकरणामुळे खेळाडूंच्या आनंदावर विरजण पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. निवडणुकीत क्रीडा संकुलाचा वापर झाल्यावर ते आता दुर्लक्षित झाले आहे. गरज सरो आणि वैद्य मरो या निवडणूक विभागाच्या भूमिकेबाबत वेगवेगळ्या स्तरातून नाराजी व्यक्त होत आहे.

क्रीडा संकुलाला दुरुस्ती नूतनीकरणाची प्रतीक्षा
क्रीडा संकुलाच्या इमारतीची अवस्था बिकट झाली आहे. येथील कार्यालयाला गळती लागली आहे. स्वीमिंग पूलची इमारत जीर्ण झाली आहे. त्यामुळे ती भिंत पडण्याच्या अवस्थेत आहे. खिडक्यांना पत्रा लावून ठेवल्याने हॉलमध्ये आतील-बाहेरील हवा येणे जाणे बंद झाले आहे. त्याचा खेळाडूंना प्रचंड त्रास होत आहे. खिडक्या नव्याने तयार करण्याची गरज आहे. त्यामुळे या क्रीडा संकुलाला दुरुस्ती व नूतनीकरणाची प्रतीक्षा लागून राहिली आहे.
पाच कोटींची गरज
जिल्हा क्रीडा संकुलाला अद्ययावत मल्टीपर्पज हॉलची गरज आहे. या हॉलमध्ये कबड्डी, खो-खोसारखे खेळ मॅटवर खेळविता येणार आहेत. प्रेक्षक गॅलरी, कार्यालयाला असलेली गळती, अशा अनेक दुरुस्तीच्या कामासह नूतनीकरणकरणेदेखील आवश्यक आहे. त्यासाठी पाच कोटींहून अधिक रुपयांची गरज आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे त्याचा प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
जिल्हा क्रीडा संकुलाचे वीज बिल थकीत
जिल्ह्यातील खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळावे, यासाठी नेहुली या ठिकाणी जिल्हा क्रीडा संकुल बांधण्यात आले. मात्र, या क्रीडा संकुलाचे वीज बिल गेल्या दोन महिन्यांपासून थकीत असल्याचे समजते. सुमारे दोन लाख रुपयांचे बिल थकले आहे. निवडणुकीत केलेल्या वापरामुळे वीज बिल अधिक आल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे बिल कोण भरणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे.
25 लाख रुपयांचे भाडे थकले
कोरोना काळात कोव्हीड सेंटर म्हणून जिल्हा क्रीडा संकुलचा वापर करण्यात आला होता. जिल्हा परिषद आरोग्य विभागच्या कार्यालयाकडून 25 लाख रुपयांचे भाडे देणे बाकी होते. याबाबत तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी बैठक घेऊन संबंधित अधिकार्‍यांना सूचना करीत दुरुस्ती करा अन्यथा निधी उपलब्ध करा, असे सांगितले होते. मात्र, त्यांची बदली झाल्यानंतर हे प्रकरण लाल फितीतच अडकून राहिले आहे. त्यामुळे 25 लाख रुपयांचे भाडे थकले असल्याची माहिती समोर येत आहे.

कोरोना काळात कोव्हीड सेंटर म्हणून जिल्हा क्रीडा संकुलाचा वापर केला होता. आरोग्य विभागाकडे पुरेसा निधी नसल्याने जिल्हा नियोजनमधून निधी उपलब्ध करण्याची मागणी करण्यात आली आहे.

डॉ. मनीषा विखे,
जिल्हा आरोग्य अधिकारी

निवडणुकीच्या कामानंतर जिल्हा क्रीडा संकुल परिसरात काही कचरा पडलेला असेल, तर त्याची पाहणी करण्यासाठी तहसीलदार यांना पाठविले जाणार आहे. त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल.

मुकेश चव्हाण,
उपविभागीय अधिकारी, अलिबाग

Exit mobile version